‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव. नम्रता मंचावर साकारत असलेलं प्रत्येक पात्र प्रेक्षकांना खळखळून हसवण्यास भाग पाडतं. तिने अधिकाधिक मेहनत करत कलाविश्वामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. इतकंच नव्हे तर नम्रताचे लाखोंच्या घरात चाहते आहेत. कामाव्यतिरिक्त ती सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसते. बऱ्याचदा नम्रता तिच्या खासगी आयुष्याबाबतही खुलेपणाने व्यक्त होते. नम्रता तिचा लेक रुद्राजचे शेअर करत असलेले व्हिडीओही चर्चेचा विषय ठरतात. आताही तिने तिच्या मुलाचा शेअर केलेला व्हिडीओ लक्ष वेधून घेत आहे. (namrata sambherao son told about marathi langauge)
या व्हिडिओमध्ये तिचा मुलगा रुद्राज तिला मराठी भाषेबाबत सांगताना दिसत आहे. तो त्याच्या आईला(नम्रता) सांगतो की, “भारत देश म्हणजे अमेरिका नाही. आई हा आपला भारत आहे. भारतात सगळे मराठीमध्येच बोलतात. तूसुद्धा भारतामध्ये इंग्रजी नाही बोलायचं, मराठीत बोलायचं!”, असं म्हणत रुद्राजने त्याच्या आईला(नम्रता) इंग्रजीत न बोलण्याची ताकिद दिली. त्यावर नम्रता त्याला विचारते, “मराठीच बोलू, इंग्रजीत नको बोलू?” त्यावर तो तिला उत्तर देतो की, “हो आई”.
नम्रताने तिच्या लेकाच्या या व्हिडीओला छान कॅप्शनही दिलं. ती म्हणाली, ‘माझ्या बाळाची मराठीबद्दलची आत्मियता व प्रेम बघून खूप अभिमान वाटला. मराठी माध्यमं लोप पावत चालली आहेत. याची खूप खंत वाटते. आमच्या आसपास मराठी माध्यमं नाही ही खूप वाईट परिस्थिती आहे’, नम्रताने मराठी भाषेबाबत व मराठी माध्यमांच्या कमतरतेबाबत खंत व्यक्त केली.
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं की,, ‘मराठी भाषा टिकवायची असेल तर अशी मुलं घडवायला हवीत’. तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं, ‘अरे वा. इतक्या लहान वयात इतकी समज. खरंच अभिमान वाटला. त्याला खूप प्रेम व आशीर्वाद’. नम्रताच्या चाहत्यांनी रुद्राजला मिळालेल्या संस्कारांबद्दल कौतुक केलं आहे.