‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅप्स’चं नवं पर्व सध्या बरंच चर्चेत आहे. या पर्वातील सर्व लिटिल चॅप्सनी आपल्या गोड व मधूर आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे या पर्वातील प्रत्येक लिटिल चॅप्सचा वेगळा असा चाहतावर्ग आहे. या कार्यक्रमाच्या बऱ्याच खास गोष्टी आहेत पण ही देखील एक गोष्ट आहे की, या कार्यक्रमाच्या सेटवर दर आठवड्याला काहीना काही स्पेशल घडत असतं. या आठवड्यातही अशीच एक खास गोष्ट घडली ती म्हणजे या मंचावर बऱ्याच दिवसांनी पोस्टमनची भूमिका साकरत सागर कारंडे आला. (Sagar karande read special letter for suresh wadkar)
अभिनेता सागर कारंडेला आजवर आपण वेगवेगळ्या भूमिकांमध्ये बघितलं आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात त्याने वेगवेगळी पात्र साकारत आपली वेगळी अशी ओळख तयार केली आहे. त्याने आपल्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवला आहे. पण त्याची पोस्टमन ही भूमिका विशेष गाजली. आजवर त्याने ज्या पद्धतीने पत्र वाचली त्यामुळे बऱ्याच कलाकारांचे डोळे पाणावले आहेत. त्याच्या पत्र वाचण्याच्या पद्धतीने कलाकरांचच नाही तर प्रेक्षकांचीही मनं जिंकली आहेत. अशा या लोकप्रिय पोस्टमनने या आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅप्स’च्या मंचावर हजेरी लावली. त्यावेळी तो सुरेश वाडकर यांच्यासाठी एक खास व्यक्तीचं पत्र घेऊन आला होता. नुकताच हा व्हिडिओ ‘झी मराठी’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला.
‘संदेसे आते है’ या गाण्याच्या ट्रॅकवर सागरने नेहमीप्रमाणे ‘सारेगमप लिटिल चॅप्स’च्या मंचावर एण्ट्री घेतली. त्याने सुरेश वाडकरांसाठी पत्र आणल्याचं उघड करत ते पत्र त्यांच्या आईचं असल्याचा खूलासा केला. पत्रातून त्याने सुरेश वाडकरांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याने सुरेश वाडकरांच्या बालपणापासूनचा संघर्ष त्यांच्या पुन्हा डोळ्यासमोर उभा केला. हे पत्र ऐकून सुरेश वाडकरांसह सर्वजण भावूक झाले होते.
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही लाईक व कमेंटचा वर्षाव केला. एक नेटकऱ्याने ‘सागर दादा खूप छान पत्र वाटलं’, असं लिहीत सागरच्या पत्र वाचनाचं कौतुक केलं. दुसऱ्या नेटकऱ्यानं, ‘सागर कारंडे पत्रासह अश्रुही घेऊन येतो’, अशी प्रतिक्रिया देत त्यांचं कौतुक केलं.