दरवर्षी ६ डिसेंबर हा दिवस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुण्यतिथी दिवस म्हणून साजरा केला जातो. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन ६ डिसेंबर १९५६ रोजी झाले. बाबासाहेबांची पुण्यतिथी देशभरात ‘महापरिनिर्वाण दिन’ म्हणून साजरी केली जाते. संविधान निर्माते डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे थोर समाजसुधारक आणि अभ्यासक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण हे संपूर्ण भारतासाठी प्रचंड शोकाचे होते. (Mahaparinirvaan Movie First Look)
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनाने लाखों लोकांच्या हृदयात एक पोकळी निर्माण झाली. अनेकांच्या भावनांना ओघ आला, अनेकांनी शोक व्यक्त केला, प्रार्थना सभा घेतल्या आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. अशातच आज ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त, ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये बाबासाहेबांच्या अंतयात्रेतील लाखों लोकांची गर्दी पाहून अंगावर अक्षरशः काटे उभारले. चित्रपटातील फर्स्ट लूकमधील चित्रित केलेला हा सीन शक्तिशाली कथाकथनाने मार्मिकपणे प्रेक्षकांना मोहित करत आहे.
चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये “माणूस मेल्यावर त्याची राख होते, आपण राख विसर्जित करतो, पण मला त्या राखेच्या दिव्य व तेजस्वी कणातूनच इतिहास घडवायचा आहे” असे म्हणत अभिनेता प्रसाद ओक याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी घडलेल्या गुंतागुंतीच्या भावना व घटनांचा उलगडा करणाऱ्या श्री. नामदेवराव व्हटकर यांची भूमिका साकारलेली पाहायला मिळत आहे. याचबरोबर अभिनेता गौरव मोरेचाही चित्रपटातील फर्स्ट लूक समोर आला आहे. मात्र त्याची नेमकी भूमिका काय आहे, हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. शिवाय चित्रपटात डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका कोण साकारणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
‘महापरिनिर्वाण’ हा चित्रपट या ऐतिहासिक प्रसंगाचा समाजावर व त्या व्यक्तीच्या जीवनावर झालेल्या खोल परिणामांवर प्रकाश टाकणारा आहे. या चित्रपटाद्वारे प्रसाद ओक, गौरव मोरे, अंजली पाटील, कमलेश सावंत, दीपक करंजीकर, प्रफ्फुल सावंत , विजय निकम , हेमल इंगळे, कुणाल मेश्राम यासारखे नामवंत कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा शैलेंद्र बागडे याने साकारली आहे.