सध्या सर्वत्र ‘झिम्मा २’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. नुकताच प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करत असून प्रेक्षकांचेही चांगलेच मनोरंजन करत आहे . अनेक चित्रपटगृहांबाहेर या चित्रपटाला ‘हाऊसफूल’चे बोर्डही लागत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमत्ताने कलाकार अनेक ठिकाणी भेटी देत आहेत. प्रेक्षकांचा उत्साह वाढवण्यासाठी कलाकार चित्रपटगृहात जाऊन चाहत्यांना भेटत आहेत. अशातच हे कलाकार पुण्याला काही ठिकाणी भेटी देण्यासाठी गेले होते. तेव्हा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर व अभिनेत्री क्षिती जोग हे त्यांच्या पुण्यातील शाळेत गेले होते आणि यानिमित्ताने त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. (Actor Siddharth Chandekar On Instagram)
सिद्धार्थ व क्षिती या दोघांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास व्हिडीओ शेअर करत त्यांच्या बालपणीच्या जुन्या आठवणी चाहत्यांबरोबर शेअर केल्या आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांनी ‘सेठ दगडूराम कटारिया इंग्लिश मिडियम हायस्कूल’ शाळेला भेट दिल्याचे दिसत आहे. ज्या शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले आहे. या दोन्ही कलाकारांनी शाळेचा वर्ग, आजूबाजूचा परिसर, मैदान त्याचबरोबर शाळेच्या उपहारगृहात फेरफटका मारत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
हा खास व्हिडीओ शेअर करत त्याने या व्हिडीओखाली कॅप्शनमध्ये असं लिहिल आहे की, “आयुष्यातील पराभव व विजयाचं महत्त्व जाणून घेण्यासाठी आपण इथे पुन्हा जाऊ शकतो का? त्यावेळच्या जुन्या गोष्टी आता पुन्हा आठवल्या की, डोळे भरून आल्याशिवाय राहत नाहीत.” त्याचबरोबर या व्हिडीओद्वारे त्याने “आपण जर त्या जुन्या आठवणींमध्ये पुन्हा जाऊ शकतो? ते चिंतामुक्त आयुष्य आपण पुन्हा केव्हा जगू शकतो? एकत्र डब्यातलं जेवण जेवायचं किंवा अडीच रुपयांचा गरमागरम वडापाव खायचा. या सगळ्या गोष्टी आठवल्यावर चेहऱ्यावर आपसूकच हसू येतं.” असंही म्हटलं आहे.
या व्हिडीओखाली कमेंट्समध्ये त्याच्या अनेक चाहत्यांनी व काही कलाकारांनीही आम्ही त्या शाळेचे विद्यार्थी असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर त्या जुन्या दिवसांची पुन्हा एकदा सफर करुन आणल्याबद्दल त्याचे कौतुक व त्याला धन्यवाददेखील म्हटले आहे. दरम्यान, त्यांच्या ‘झिम्मा २’ या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तसेच सिद्धार्थ व क्षिती यांच्या ‘कबीर’ व ‘मिता’ या पात्रांसह चित्रपटातील इतर कलाकारांनादेखील भरपूर प्रेम मिळत आहे.