सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती म्हणजे ‘अॅनिमल’ या चित्रपटाची. १ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटाचे वादळ बॉक्स ऑफिसवर धडकले आहे. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाचे तिकीट मिळणे कठीण झालं होतं. त्यानंतर चित्रपट प्रदर्शनानंतर अगदी पहिल्या दिवसापासून हा शो हाऊसफुल्ल असलेला पाहायला मिळत आहे. १०० कोटींचे बजेट असलेल्या या ‘अॅनिमल’ चित्रपटाने दोनच दिवसांत बजेटचा आकडा पार केला आहे. (Upendra limaye On Animal)
रणबीर कपूर अभिनीत या सिनेमात रश्मीका मंदाना, अनिल कपूर यांच्या भूमिका आहेत. तसेच अभिनेता बॉबी देओलही या सिनेमात खास भूमिकेत आहे. याशिवाय चित्रपटात एका खास कलाकाराच्या एन्ट्रीने धुमाकूळ घातलेला पाहायला मिळत आहे. बॉलिवूड चित्रपटात मराठी कलाकाराने घातलेला कल्ला साऱ्या रसिक प्रेक्षकांना वेड करून सोडत आहे.
सुप्रसिद्ध अभिनेते उपेंद्र लिमये यांनी आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याच्या दमदार आवाजाचे अनेक फॅन आहेत. अगदी आवाजाचा बादशाह म्हणून प्रसिद्ध असलेले बिग बी अमिताभ बच्चन यांनीही उपेंद्र यांच्या आवाजाचे कौतुक केले. दमादर आवाज व रावडी भूमिकेसह उपेंद्र लिमये ‘अॅनिमल’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारताना दिसत आहेत. त्यांच्या या भूमिकेने अनेकांच्या मनात घर केलं. प्रेक्षकवर्ग त्यांच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक करताना दिसत आहे. अशातच उपेंद्र यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ‘अॅनिमल’ चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबद्दल, एकूणच चित्रपटाबद्दल भाष्य केलं आहे.
उपेंद्र लिमये यांनी नुकतीच ‘इट्स मज्जा’ या चॅनेलला एक्सक्ल्युझिव्ह मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी चित्रपटात काम करण्याबाबत चित्रपट प्रदर्शनापूर्वी कुठेही माहित नसल्याचा खुलासा केला. उपेंद्र लिमये म्हणाले, “दिग्दर्शकाला मी माझं हे पात्र पाहुणा कलाकार म्हणून ठेवायला सांगितलं होतं. आणि त्यालाच माझी ही भूमिका सरप्राईज म्हणून ठेवायची होती. त्यात मी माध्यमांपासून दूर असल्यामुळे पहिला सेल्फी, शूटिंग दरम्यान काढलेला फोटो स्टोरीला पोस्ट करणं याच्याशी माझा काही फारसा संबंध येत नाही. त्यामुळे याबाबत कोणाला कळलं नाही. अगदी जगभरातून माझ्या या भूमिकेचं कौतुक केलं जात आहे, मला मॅसेज, फोनकॉल्स करून जवळची, लांबची नातेवाईक मंडळी सांगत आहेत. जर मी आधीच चित्रपटात काम करत आहे असं सांगितलं असतं तर त्याने तसा काही फरक पडला नसता” असं म्हणत उपेंद्र यांनी चित्रपटात भूमिका साकारत असल्याचा खुलासा न केल्याबाबत भाष्य केलं.