अनेक कार्यक्रम प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत असतात. या कार्यक्रमांच्या यादीतील एक महत्वाचं नाव म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. बऱ्याच कालावधीपासून चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं. परंतु आता या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाचा अखेरचा भाग शूट करण्यात आला. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात आजपर्यंत मराठीसह बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने अभिनेता कुशल बद्रिके, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, निलेश साबळे यांच्यासह अभिनेत्री श्रेया बुगडे, स्नेहल शिदम यांनी प्रेक्षकांच्या कौतुकाची थाप मिळवली. या लोकप्रिय कार्यक्रमाच्या बंद होण्याने प्रेक्षकवर्गात चांगलीच नाराजी पाहायला मिळते. अभिनेता कुशल बद्रिकेने देखील ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर भावूक होत एक पोस्ट शेअर केली आहे.(Kushal Badrike Emotional Post)
कुशलने इंस्टाग्राम अकाउंटवरुन ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावरील काही फोटो शेअर करत त्या फोटोला “माय-बाप प्रेक्षकहो सगळ्यांचे मनापासून आभार. चूक भूल द्यावी घ्यावी.” असं कॅप्शन दिलं आहे. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रदर्शित झाल्यानंतर कुशलने ही पोस्ट शेअर केली. या फोटोंना कुशलने “निरोप घेतो आता आज्ञा असावी…” या भजनाच्या काही ओळी जोडल्या आहेत. कुशलच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी त्याचे आणि कार्यक्रमाचे आभार मानले आहेत तसेच लवकर हा कार्यक्रम परत सुरु करा असा आग्रह देखील केला आहे.
आणखी वाचा- ‘बिग बॉस’ फेम एल्विश यादवला अटक, पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याप्रकरणी नोएडा पोलिसांची कारवाई
कुशलच्या भावूक पोस्टवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी देखील कमेंट्स केल्या आहेत. अभिनेता संतोष जुवेकरने या पोस्टवर कमेंट करत लिहिलं आहे “तुम्ही परत येणार सगळे नवीन रूपात नवीन जोमात. पुराना जायेगा तभीतो नया आयेगा. Love u all आणि खूप खूप प्रेम तुम्ही सगळ्यांनी खूप हसवून हसवून आठवणी आणि खळखळते हसण्याचे क्षण आम्हाला दिले आहेत.” अशी आभार, प्रेम व्यक्त करणारी कमेंट केली आहे.(Kushal Badrike Emotional Post)
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचे लेखक, दिग्दर्शक तसेच निवेदक असणारे डॉक्टर निलेश साबळे यांच्या अचानक कार्यक्रमातून एक्झिट घेण्याने या कार्यक्रमाची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली होती. परंतु काही दिवसांनंतर कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाची देखील घोषणा करण्यात आली आणि या चर्चांना पूर्णविराम मिळाला. आता ‘चला हवा येऊ द्या’ आणि या कार्यक्रमातील कलाकार कोणत्या नवीन रूपात प्रेक्षकांच्य्या भेटीला येणार या बाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता असल्याचं पाहायला मिळतंय.