‘बिग बॉस ओटीटी २’चा विजेता एल्विश यादव हा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. गेले काही दिवस सोशल मीडियासह इतर अनेक माध्यमांत त्याच्या नावाच्या चांगल्याच चर्चा होताना पाहायला मिळत आहेत. आज या कारणामुळे तर उद्या त्या कारणामुळे त्याच्याबद्दलच्या चर्चा या सतत सुरुच असतात. अशातच त्याला नुकतीच अटक करण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे.
एल्विशला रेव्ह पार्ट्यांमध्ये मादक पदार्थ म्हणून सापाचे विष वापरल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. रेव्ह पार्ट्यांमध्ये मादक पदार्थ म्हणून सापाचे विश वापरणाऱ्या टोळीची नोएडा पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीत एल्विशचे नावही समोर आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. नोएडा पोलिसांनी एल्विशला चौकशीसाठी बोलावले होते. या चौकशीदरम्यान एल्विश पोलिसांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
नोएडा पोलिसांनी सापाच्या विषाचे काही नमुने जयपूर येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी चाचणीसाठी पाठवले होते. हे कोब्रा-क्रेट प्रजातीच्या सापांचे विष असल्याचे अहवालात सांगण्यात आले. या प्रकरणी नोएडा सेक्टर ४९ पोलीस ठाण्यात आणखी काही लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भाजप खासदार मनेका गांधी यांच्या संस्थेने प्रथम एल्विशविरोधात एफआयआर दाखल केले होते.
एल्विशला नोएडाच्या सेक्टर ११३ येथून अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एल्विश यादववर पार्ट्या आणि क्लबमध्ये सापाचे विष पुरवल्याचा आरोप करण्यात आला असून पार्ट्यांमध्ये सापाचे विश वापरले जाणे वा त्याचे सेवन करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे या गुन्ह्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याच कारवाईअंतर्गत त्याला अटक करण्यात आली आहे.