झी टीव्ही वाहिनीवरील ‘कुंडली भाग्य’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे श्रद्धा आर्या. मागील काही दिवसांपासून श्रद्धा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची खुशखबर शेअर केली होती आणि अखेर आता तिने ही गुडन्यूज दिली आहे. अभिनेत्रीने गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने आई झाल्याची बातमी शेअर केली आहे. (Shraddha Arya Blessed With Twins)
२९ नोव्हेंबर रोजी श्रद्धाने जुळ्या मुलांना जन्म दिला. तिने याबद्दल सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना मुलांच्या जन्माची माहिती दिली आहे. या व्हिडीओमध्ये श्रद्धाने आपल्या दोन्ही मुलांना मांडीवर घेतल्याचे पाहायला मिळत आहे. तसंच मुलांच्या जन्माने झालेल्या आनंदामुळे संपूर्ण घरात फुग्यांची सजावट केल्याचेही पाहायला मिळत आहे. Baby Boy व Baby Girl असं लिहिलेले फुगे या खोलीमध्ये लावल्याचे दिसत आहेत.
श्रद्धाने आपल्या जुळ्या मुलांच्या शेअर केलेल्या या व्हिडीओखाली “दोन छोट्या छोट्या आनंदाने आमचे कुटुंब पूर्ण झाले आहे आणि यामुळे आमचे हृदयही दुप्पट भरलं आहे” असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सोशहल मीडियावर हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसंच अनेकांनी अभिनेत्रीचे कौतुक व अभिनंदनही केलं आहे. “खूप सुंदर”, “अभिनंदन”, जुळ्या मुलांना खूप प्रेम आणि आशीर्वाद” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केलं आहे.
दरम्यान, श्रद्धाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर तिने नोव्हेंबर २०२१ मध्ये भारतीय नौदल अधिकारी राहुल नागलशी लग्न केले. श्रद्धाच्या लग्नाला काही खास लोकांनीच हजेरी लावली होती. या वर्षी सप्टेंबरमध्ये श्रद्धाने आई होणार असल्याची खुशखबर शेअर केली होती. श्रद्धा तिच्या ‘कुंडली भाग्य’साठी ओळखली जाते. या मालिकेमध्ये श्रद्धाने प्रीताची भूमिका साकारली होती. प्रीताची भूमिका साकारून श्रद्धा प्रत्येक घराघरांत प्रसिद्ध झाली.