२०२३ मध्ये गणपतीच्या दिवसांत ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं होतं. हे मूळ गाणं माऊली व शौर्या घोरपडे या दोन भावंडांनी गायलं होतं. परंतु, या गाण्यावरचा बालकलाकार साईराज केंद्रेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला होता. साईराजचे गोंडस व निरागस हावभाव पाहून सगळेच थक्क झाले होते. यामुळे सोशल मीडियावर सर्वत्र साईराजची चर्चा चालू होती. अशातच ‘अप्पी आमची कलेक्टर’ या लोकप्रिय मालिकेत साईराजची एन्ट्री झाली. (Sairaj Kendre Video)
‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत साईराजने अमोल ऊर्फ सिम्बा हे पात्र साकारलं आहे. मालिकेत प्रेक्षकांना सात वर्षांचा लीप पाहायला मिळाला आणि त्यानंतर साईराजची एन्ट्री झाली होती. त्याचे निरागस हावभाव, दमदार अभिनय यामुळे मालिकेच्या टीआरपीवर देखील सकारात्मक परिणाम झाला. यानंतर त्याच्या लोकप्रियतेतव व प्रसिद्धीमध्ये चांगलीच वाढ झाली आणि आता मालिकेतला सिंबा सर्वांच्या आवडीचा झाला आहे. त्याला भेटण्यासाठी चाहते आतुर असतात. अशातच सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये सिंबा म्हणजेच साईराज भेटण्यासाठी एक आजी आतुरतेने वाट पाहत आहे. ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेचे कलाकार सध्या प्रेक्षकांची भेट घेत आहेत. याचनिमित्ताने सिंबा व अप्पी म्हणजेच साईराज व शिवानी नाईक यांनी प्रेक्षकांची भेट घेतली. यावेळी भेट घेऊन जात असताना सिंबाच्या गाडीजवळ एक आजी आल्या आणि त्यांनी सिंबाची दृष्ट काढली. “आमच्या घरी ये बाळा… किती छान आहेस बाळा. उमेद दिलीस म्हाताऱ्या माणसाला’…” असं म्हणत त्यांनी सिंबाचे कौतुकही केलं.
सिंबा व आजींच्या भेटीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडीओखाली कमेंट्समध्येही सिंबाचे कौतुक केलं आहे. “खूप छान”, “खूपच भारी”, “सिंबाला असंच प्रेम मिळो” अशा अनेक कमेंट्सद्वारे नेटकटऱ्यांनी सिंबा म्हणजेच साईराजचे कौतुक केलं आहे. दरम्यान, मालिकेत सध्या त्याच्या आजारपणाचे कथानक सुरु आहे, त्याला झालेल्या गंभीर आजारावर तो मात करत आहे. मालिकेचे कथानक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.