आगामी लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून जवळ जवळ सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबरच कार्यकर्तेदेखील आगामी निवडणुकांच्या तयारीला लागळ आहेत. त्यामुळे सर्वत्रच निवडणुकींचा चांगलाच माहोल बनला आहे. त्यामुळे नेत्यांबरोबरच कार्यकर्त्यांकडूनही एकमेकांविरोधात आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे किरण माने यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे.
किरण मानेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात काही पत्रकार महिलांना निवडणुकीबद्दल काही प्रश्न विचारत आहेत. यावेळी पत्रकार एका महिलेला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तुम्हाला भेटले तर तुम्ही काय कराल?” असा प्रश्न विचारतात. यावर ती महिला चिडून “मी काय त्यांची पूजा करु? की नारळ फोडू?, नरेंद्र मोदी आले तर मी त्यांना विचारेन की, माझ्या ४० वर्षाच्या मुलाला अजून नोकरी नाही आहे. आम्ही आमच्या मुलांना इतकं शिकवलं आहे, पण पंतप्रधान मोदींनी त्यांच्यासाठी काय केलं आहे? जातीचा दाखलाही मिळत नाही. हे मोदींना विचारा.”
यानंतर त्या पत्रकाराने दुसऱ्या महिलेलाही पंतप्रधान मोदींबद्दल प्रश्न विचारला. यावेळी त्या दुसऱ्या महिलेने उत्तर देत असं म्हटलं की, “इथे राहुल गांधी येणार आहेत तर तुम्ही त्यांच्याबद्दल काहीतरी विचारा ना. राहुल गांधी न्याय मागत आहे तर तो न्याय मिळेल. आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे.” यानंतर तो पत्रकार पुन्हा त्या महिलेला पंतप्रधान मोदींबद्दल प्रश्न विचारताच, “तुम्ही मोदींचे नाव नका घेऊ. आम्ही राहुल गांधी व उद्धव बाळासाहेब ठाकरेंबद्दलच बोलणार. येत्या निवडणुकीत आम्ही फक्त ‘इंडिया’चं मत देणार” असं उत्तर देतात.
या महिलांचा हा व्हिडीओ किरण मानेंनी शेअर केला असून या व्हिडीओखाली त्यांनी “आमच्या मुंबईकर बहिणींचा नाद करायचा नाही. त्या जे असेल ते तोंडावर रोखठोक बोलतात. मिडीयाने त्यांना प्रश्न विचारताना कितीही भरकटवलं तरी त्या आपला मुद्दा सोडत नाहीत. खटक्यावर बोट जाग्यावर पल्टी” असं म्हटलं आहे. दरम्यान, किरण मानेंनी नुकतीच निवडणुकींच्या तारखांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर उपरोधिक टीका केली होती.