गेल्या बऱ्याच दिवसांपासून रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ चित्रपट चर्चेत आहे. रितेश सध्या याच चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. मात्र चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असताना एक दुःखद बातमी आता समोर आली आहे. ‘राजा शिवाजी’मधील कलाकाराचं निधन झालं आहे. सौरभ शर्मा असं या कलाकाराचं नाव आहे. सौरभ डान्सर असल्याचं काही वृत्तांमधून समोर आलं. साताऱ्यातील संगम माहुलीला चित्रीकरण सुरु होतं. दरम्यान तेथील नदीमध्ये सौरभला पोहण्याचा मोह आवरला नाही. नदीमध्ये गेला असताच त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर सेटवरील मंडळीही हळहळली. (Riteish deshmukh movie set junior artist death)
नक्की काय घडलं?
एबीपी माझाच्या वृत्तानुसार, सौरभ कृष्णा नदीत पोहण्यासाठी गेला होता. मात्र त्याला बहुदा पाण्याचा अंदाज आला नाही. तो नदीतील पाण्याच्या डोहात बुडाला. बराच वेळ एक कलाकार नसल्याचं सेटवरील इतर व्यक्तींनाही लक्षात आलं. त्यानंतर शोध सुरु झाला. सेटवरील टीमने स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सौरभचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र शोध घेता अंधार पडल्याने शोधकार्य तिथेच थांबलं. मात्र या संपूर्ण घटनेची माहिती साताऱ्यातील पोलिस कर्मचाऱ्यांना देण्यात आली.
आणखी वाचा – “हल्लेखोर स्थानिक मदतीशिवाय पोहोचलेच कसे?, घरात घुसून मारा”, पहलगाम हल्ल्याप्रकरणी मराठी कलाकार भडकले
नदीत पोहायला गेला अन्…
पोलिसही घटनास्थळी पोहोचले. शोधकार्य थांबले असताना आज (२३ एप्रिल) पुन्हा सौरभचा शोध घेण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र अद्यापही त्याचा मृतदेह हाती मिळाला की नाही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. काही वृत्तांनुसार, सौरभ हा घाटकोपर पश्चिम भागात राहणारा आहे. तसेच तो मुळ राजस्थानचा आहे. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसलेही घटनास्थळी पोहोचले होते.
रितेशच्या प्रॉडक्शन टीमने या संपूर्ण घटनेबाबत सविस्तर माहिती दिली आहे. दोन दिवसाचं शूट संपलं असताना काही कलाकार जवळच्या नदीपात्रात पोहायला गेले होते. मात्र सौरभ यामध्ये नदीपात्रात हरवला. ही बातमी समजताच रितेश, जिनिलिया देशमुख व नृत्यदिग्दर्शक रेमो डिसुझा घटनास्थळी पोहोचले. इतकंच नव्हे तर त्यांनी आता चित्रपटाचं चित्रीकरणही थांबवलं आहे. अजूनही शोधकार्य सुरु आहे. यासंदर्भातील पोस्ट खालीलप्रमाणे…
आणखी वाचा – “’काश्मीर फाइल्स’ला नावं ठेवली आता तेच झालं”, पहलगाम हल्ल्यानंतर अनुपम खेर भडकले, बॉलिवूड कलाकारांचाही संताप
‘राजा शिवाजी’च्या सेटवर सौरभ ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करत होता. या घटनेनंतर सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. रितेश या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. तसेच त्याची चित्रपटामध्ये मुख्य भूमिका आहे. त्याचबरोबरीने अभिषेक बच्चन, संजय दत्त, फरदीन खान सारखे बॉलिवूड कलाकारही ‘राजा शिवाजी’मध्ये दिसतील. मात्र सध्यातरी सौरभच्या जाण्याने ‘राजा शिवाजी’च्या सेटवर दुःखाचं सावट पसरलं आहे.