‘झिम्मा’ चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. आज हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शनापूर्वीपासूनच या चित्रपटाची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. चित्रपटाच्या टिझर, ट्रेलर व गाण्याने या चित्रपटाची उत्सुकता वाढविली. चित्रपटात कलाकारांनी केलेला कल्ला हा प्रेक्षकांना पाहणं रंजक ठरतोय. झिम्मा चित्रपटात सात बायकांची निरनिराळी तऱ्हा पाहायला मिळणार आहे. (Purva Pandit On Nirmiti Sawant)
या चित्रपटातून तगड्या, लोकप्रिय कलाकारांची फौज पुन्हा एकत्र येत आहे. चित्रपटात सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव, निर्मिती सावंत, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे यांच्या भूमिका लक्षवेधी आहेत. निर्मिती सावंत यांच्या भूमिकेने तर अक्षरशः धुमाकूळ घातला असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच निर्मिती सावंत यांच्या रिअल लाईफ सुनेने केलेली पोस्ट सध्या साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
निर्मिती सावंत यांची सून पूर्वा पंडित हिने सोशल मीडियावरून झिम्मा चित्रपट पाहिल्यानंतर सासूसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. सासूचं कौतुक करत पूर्वा म्हणाली की, “काल रात्री मला या अद्भुत स्त्रीमुळे एक आनंदाचा अनुभव अनुभवायला मिळाला, या विलक्षण स्त्रीला मी अभिमानाने मम्मा अशी हाक मारते. मित्रांनो मी खरं सांगते, ‘झिम्मा २’ चित्रपटात माझी मम्मा पूर्ण महाराष्ट्राला वेड लावणार आहे. माझे हे शब्द लक्षात ठेवा. इतका सुंदर चित्रपट बनवल्याबद्दल मी ‘झिम्मा २’ च्या संपूर्ण टीमचे अभिनेत्यांपासून ते अगदी सर्व तंत्रज्ञांचे आभार मानते. त्याबरोबरच ‘कॅप्टन ऑफ द शिप’ असलेल्या हेमंत ढोमेने इतका सुंदर चित्रपट बनवल्याबद्दल मी त्याची ही आभारी आहे”.
यापुढे पूर्वाने लिहिलं आहे की, “मी चित्रपटांबद्दल सहसा बोलत नाही. पण या चित्रपटाने मला खूप भारावून टाकलं आहे. काल रात्री हा चित्रपट पाहिल्यानंतर अजूनही त्यातून मला बाहेर पडता येत नाही आहे. मी फक्त इतकंच सांगेन की ‘झिम्मा २’ हा चित्रपट भारतीय सिनेमांचा स्तर उंचावेल. या चित्रपटाचा आशय, विषय हा आताच्या काळाशी संबंधित असून प्रेमळ आहे. त्यामुळे लवकरात लवकर चित्रपटगृहात जाऊन ‘झिम्मा २’ पाहा”, अशी पोस्ट पूर्वा पंडितने केली आहे.