अभिनेता वत्सल सेठ व अभिनेत्री इशिता दत्ता यांनी काही दिवसांपूर्वीच चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. वत्सल व इशिताच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. त्यांनी सोशल मीडियाद्वारे खास पोस्ट शेअर करत सगळ्यांबरोबर हा आनंद सेलिब्रेट केला. वत्सलला ‘द वंडर कार’ चित्रपटाला तर अभिनेत्री इशिता ही ‘दृश्यम’ चित्रपटाला प्रेक्षकांनी विशेष प्रेम दिलं. वत्सल व इशिता २०१७मध्ये विवाहबंधनात अडकले. त्यानंतर तब्बल ६ वर्षांनी त्यांच्या आयुष्यात नवा पाहुणा आला आहे. (Ishita And Vatsal Shared A Video)
१७ जुलैला इशिताने एका गोंडस मुलाला जन्म दिला. नुकताच पारंपारिक पद्धतीने त्यांनी मुलाचा नामकरण सोहळा साजरा केला. नामकरण सोहळ्यातील काही क्षण त्यांनी व्हिडिओद्वारे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इशिता व वत्सल यांनी त्यांच्या मुलाचं नाव वायू ठेवलं आहे. चाहत्यांकडून मिळत असलेलं प्रेम व आशिर्वाद पाहून दोघंही भारावून गेले आहेत. दोघांनीही चाहत्यांचे विशेष आभार मानले. विशेष म्हणजे, अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांनीही आपल्या मुलाचे नाव वायू असे ठेवलं. हे नाव हिंदू देवता वायूदेवापासून प्रेरित आहे.
पाहा – कसा साजरा झाला नामकरण सोहळा ! (Ishita And Vatsal Shared A Video)
इशिता व वत्सलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दोघांनीही बाळाला जवळ घेतल्याचं दिसत आहे. त्यांनी नामकरण सोहळा अगदी साध्या पद्धतीने घरीच साजरा केला. कुटुंबातील मंडळींनी एका कापडाचाच पाळणा तयार केला. त्याच पाळण्यामध्ये बाळाचं नामकरण करण्यात आलं. इशिताने बाळाच्या कानात नाव सांगितलं. साध्या पद्धतीने सोहळा साजरा केल्यामुळे अनेकांनी या जोडप्याचं कौतुक केलं. एका चाहत्याने, “वायू खूप अनोखे आणि सुंदर नाव आहे. ऐकून ‘जन्नत’ सारखं वाटतं” असं म्हणत या जोडप्यांना विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.
वायूच्या नामकरण समारंभातील व्हिडिओ शेअर करण्यापूर्वी, इशिताने तिच्या मातृत्वाच्या प्रवासाविषयी एक व्लॉग शेअर केला होता. तिने पहिल्यांदा तिच्या बाळाला जवळ घेतलेला क्षण शेअर केला होता. व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले, “माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि संस्मरणीय अनुभवांपैकी एक आहे”.