बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची लेक सुहाना खानने आपल्या वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत मनोरंजन सृष्टीत पदार्पण केलं आहे. सध्या सिनेसृष्टीत सुहाना आपले स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. आपला लूक व फॅशन स्टाइलने तिने चाहत्यांना नेहमीच भुरळ पाडली आहे. काही महिन्यांपूर्वीच सुहाना खान हिचा ‘द आर्चिज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटानंतर आता सुहाना खान तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने नुकतीच सोशल मीडिया एक पोस्ट शेअर करत तिचे ब्रेकअप झाल्याचे म्हटले आहे.
सुहानाने शेअर केलेल्या या पोस्टवर सुहानाच्या कथित प्रियकराच्या आईने म्हणजेच अगस्त्य नंदाच्या आईनेही तिची प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, काहीही निष्कर्ष काढण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की, सुहानाने तिच्या साबणाबरोबर ब्रेकअप केला आहे. सुहाना नुकतीच ‘लक्स’या साबणाची ब्रँड ॲम्बेसेडर बनली आहे आणि याच साबणाच्या जाहिरातीचा एक व्हिडिओ शेअर करत तिने असं म्हटलं आहे की, “माझ्याकडे एक बातमी आहे, माझे ब्रेकअप झाले आहे”.
सुहानाने या पोस्टद्वारे खुलासा करत असं म्हटलं की, ती तिच्या बॉयफ्रेंडबद्दल बोलत नसून ती तिच्या साबणाबद्दल बोलत आहे. सुहानाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताच तिचा कथित प्रियकर अगस्त्य नंदाची आई श्वेता बच्चन नंदाने तिच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिली. श्वेताने सुहानाच्या पोस्टवर हार्ट इमोजीची कमेंट केली आहे. सुहाना खान तिचे वडील शाहरुख खान यांच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. कारण अभिनेता शाहरुख खान हादेखील ‘लक्स’चा ब्रँड ॲम्बेसेडर होता.
दरम्यान, सुहाना खान नुकतीच झोया अख्तरच्या ‘द आर्चिज’ या चित्रपटात दिसली होती. ज्यामध्ये तिच्याबरोबर अगस्त्य नंदा व खुशी कपूरदेखील होते. सुहानाने ‘द ग्रे पार्ट’ या शॉर्ट फिल्ममध्येही काम केले आहे. सुहाना आता लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार असल्याच्या बातम्याही येत आहेत.