मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय कपल म्हणजे राणादा व पाठक बाई. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून ही जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. ही मालिका संपून बराच काळ लोटला असला तरी आज ही या मालिकेची चर्चा रंगताना पाहायला मिळतेय. मालिकेतील राणादा व पाठक बाई यांची केमिस्ट्री पाहून चाहत्यांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केलं. अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांनी २ डिसेंबर रोजी खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली. (Hardeek Joshi Comeback)
लग्नानंतर एकत्र ही जोडी टेलिव्हिजनवर काही दिसली नाही. अक्षयाने तर लग्नानंतर सिनेसृष्टीपासून काही काळ ब्रेक घेतला. तर हार्दिक काही मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. विविध मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारत आजवर हार्दिकने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अशातच हार्दिक लवकरच एका नव्या कार्यक्रमातून छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. ‘जाऊ बाई गावात’ या नव्या रिऍलिटी गेम शोमधून हार्दिकची एंट्री पाहायला मिळणार आहे. ‘झी मराठी वाहिनी’ने या कार्यक्रमाचे अनेक प्रोमो सोशल मीडियावरून शेअर देखील केले आहेत. या प्रोमोंनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
आता या कार्यक्रमाचा आणखी एक नवीन प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमध्ये ‘हार्दिक जोशी’ असं म्हणताना दिसतोय की, ‘करणार तेव्हा कळणार आता मज्जा येणार’ नेमकं काय कळणार आणि काय मज्जा येणार हे प्रेक्षकांना हळू हळू उलगडत जाणार आहे. प्रोमो वरुन हा एक गावच्या पारंपरिक संस्कृतीवर आधारित असलेला शो वाटत आहे. या कार्यक्रमाचे प्रोमो शेअर करत हार्दिक म्हणाला आहे की, “पुन्हा येतोय आपल्या मातीतला नवा कोरा कार्यक्रम घेऊन “जाऊ बाई गावात” लवकरच झी मराठीवर” असं कॅप्शन देत त्याने हे प्रोमो त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेता हार्दिक जोशी याने पुन्हा एकदा झी मराठीवर कमबॅक केलं आहे. या शोच्या प्रोमोमध्ये हार्दिकसह बैलाची झलक ही पाहायला मिळतेय. त्यामुळे ‘तुझ्यात जीव रंगला’ मधील साहेबराव देखील या शोमध्ये दिसणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला दिसतोय.