एकामागोमाग एक कलाकार मंडळी विवाहबंधनात अडकत असताना आणखी एक मराठमोळी अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे. ‘माझा होशील ना’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे लवकरच बोहोल्यावर चढणार आहे. स्वानंद तेंडुलकरसह गौतमी विवाहबंधनात अडकणार आहे. दोन दिवसांपासून गौतमीच्या बहिणीने म्हणजेच अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने बहिणीच्या लग्नाची तयारी सुरु केली होती. याचे व्हिडीओ, फोटोही ती पोस्ट करत आहे. (Gautami deshpande and swanand tendulkar mehendi)
आज गौतमीच्या हातावर स्वानंदच्या नावाची मेहंदी रंगणार आहे. मेहंदीनिमित्त गौतमी व स्वानंद यांनी रोमँटिक पोज देत फोटो शेअर केला आहे. गुलाबी रंगाच्या लेहेंगा चोळीमध्ये गौतमी खूपच सुंदर दिसत आहे. तर बायकोच्या ड्रेसला साजेसे असे कपडे स्वानंदने परिधान केले आहेत. स्वानंदही त्याच्या या मॉडर्न टच असलेल्या पारंपरिक अंदाजात हँडसम दिसत आहे. मेहंदीनिमित्त स्वानंद व गौतमीचा लूक लक्षवेधी ठरत आहे.
गौतमी व स्वानंद दोघेही रिलेशनमध्ये होते आणि आता ते लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं होतं. या चर्चांना पूर्णविराम देत आता अभिनेत्रीने आता एकत्र फोटो चाहत्यांसह शेअर केला आहे. याआधीही गौतमीची बहीण मृण्मयी हिने बहिणीच्या लग्नानिमित्त संगीत सोहळ्यासाठी तयारी करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर काल मृण्मयीने तिच्या लाडक्या बहिणीसाठी केळवणाचीही खास तयारी केलेली पाहायला मिळाली.
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे व तिची धाकटी बहीण गौतमी या दोघी सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. या दोन बहिणींचा एकमेकींबरोबरचा बॉण्ड हा खूपच खास आहे. एकमेकींबरोबरचे अनेक व्हिडीओ, फोटो त्या शेअर करतानाही दिसतात. गौतमी स्वानंदबरोबरच्या रिलेशनशिपमुळे काही दिवसांपासून चर्चेत होती. अखेर आता ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे.