ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी याच्या अचानक आलेल्या निधनाच्या बातमीने संपूर्ण सिनेसृष्टीलाच धक्का बसला. त्यांच्या निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. पुणे जिल्ह्यातील आंबी या गावात ते एकटे राहत होते, आणि त्याच राहत्या घरात ते मृतावस्थेत सापडले. घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारच्या मंडळींनी पोलिसांत तक्रार केली. तेव्हा पोलिसांनी येऊन तपासणी करताच त्यांच्या मृत्यूची बातमी दिली. यावेळी पोलिसांनी त्यांचा दोन दिवसापूर्वीच मृत्यू झाला असल्याचं घोषित केलं. यावरून नेटकऱ्यानी त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी याला चांगलंच ट्रोल केलं. (Gashmeer Mahajani On Ravindra Mahajani)
नेटकऱ्यानी वडिलांसोबत तू का नव्हतास, वडील तुझ्यासोबत का राहत नव्हते असे असंख्य प्रश्नांचा भडीमार करून गश्मीरला ट्रोल केलं. नेटकऱ्यांच्या या प्रश्नांना पूर्णविराम देत गश्मीरने भाष्य केलं आहे. नुकतीच गश्मीरने इटाईम्सला मुलाखत दिली. यावेळी त्याने म्हटलं की, “आमचं नातं एकतर्फी होतं. जेव्हा त्यांना आम्हाला भेटायची इच्छा असायची, तेव्हा ते यायचे. जेव्हा त्यांना एकटं राहावं वाटायचं, तेव्हा ते निघून जायचे.”
“माझा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा ते बराच काळ आमच्यासोबत राहिले होते. ते मूडी होते आणि त्यांना एकटं राहायला आवडायचं. त्यांना त्यांची कामं इतरांनी केलेली आवडत नसे. त्यांच्याजवळ आम्ही केअरटेकर पाठवायचो, पण एक-दोन दिवसांत त्यांना कामावरून काढून टाकायचे. गेल्या तीन वर्षापासून त्यांनी आम्ही, आमचे जवळचे कुटुंब आणि त्यांच्या जवळच्या मित्रांसह लोकांशी मर्यादित संपर्क ठेवण्यास सुरुवात केली होती.”
पुढे तो म्हणाला, “ते शेजार्यांशी संवाद साधणारे किंवा ते जिथे राहायचे तिथे मॉर्निंग वॉक ग्रुपचा भाग बनणारे नव्हते. त्यांच्या मृत्यूबद्दल आम्हाला उशिरा कळण्यामागे हे देखील एक मुख्य कारण होते. सर्वांना मी स्पष्टीकरण देतोय, असं वाटू शकतं. मी जे काही बोलतो त्याचे वेगवेगळे अर्थही काढले जातील, पण हरकत नाही.” असं म्हणत त्याने एकप्रकारे नेटकर्यांना स्पष्टीकरण देत उत्तर दिलं आहे.