ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांसह संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला. रवींद्र महाजनी यांचा मुलगा गश्मीर महाजनीला वडिलांच्या निधनानंतर अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. रवींद्र महाजनी पुण्यामध्ये एकटेच राहत होते. यावरुनच गश्मीरला अनेकांनी सुनावलं. सतत ट्रोल करणाऱ्यांना तो सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर देत आहे. तसेच त्याची पत्नी गौरीनेही त्याच्यासाठी इन्स्टाग्रामद्वारे एक पोस्ट शेअर केली होती. आता गश्मीरने त्याच्या आईबाबत एक माहिती दिली आहे.
वडिलांच्या निधनानंतर गश्मीर काही दिवस सोशल मीडियापासून दूर होता. आता तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. त्याने चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी Ask Me Anything हे सेशन ठेवलं होतं. यावेळी गश्मीरला त्याच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. तसेच त्याच्या खासगी आयुष्याबाबतही त्याला विचारलं. यावर गश्मीरने अगदी दिलखुलासपणे उत्तरं दिली.
“तुझी आई आता ठिक असेल अशी आशा करतो” असं एका चाहत्याने म्हटलं. यावर गश्मीर म्हणाला, “तिला आता रुग्णालयामधून सोडलं आहे. आता ती एकदम नीट आहे”. यावरुनच गश्मीरची आई रुग्णालयामध्ये भरती होती अशी माहिती समोर आली. दुसऱ्या एका चाहत्याने त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबाबत त्याला विचारलं. यावेळी गश्मीरने एक खुलासा केला.
गश्मीर म्हणाला, “हो खूप प्रोजेक्ट्स आहेत. पण गेल्या आठवड्यामध्ये आई पडल्यानंतर तिची काळजी घेण्यामध्ये मी व्यग्र होतो. ती आता ठिक आहे. लवकरच मी माझ्या कामाला सुरुवात करेन”. तर ट्रोल करणाऱ्यांविषयी विचारताच “त्यांना खूप वेळ असतो मी त्याच्याकडे लक्ष देत नाही” अशा शब्दांमध्ये गश्मीरने उत्तर दिलं.