सध्या एकामागोएक चित्रपट येत असून कलाकार मंडळी हे या चित्रपटाचं प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत. ऐतिहासिक, कौटुंबिक चित्रपट हे एका मागोमग एक येत असतानाच आता ऍक्शन व रोमँटिक चित्रपटाची जोड असलेल्या एका नव्या कोऱ्या चित्रपटाने चित्रपटसृष्टीत एंट्री घेतली आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका चित्रपटाची चलती होती, या चित्रपटाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ‘अंकुश’ असं चित्रपटाचं नांव असून या चित्रपटातील एक एक कलाकार प्रेक्षकांच्या भेटीस आले. (Ankush Movie Hero)
दरम्यान या चित्रपटातील पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं होत त्यात पाठमोऱ्या नायकाचा फोटो होता, तेव्हापासून चित्रपटाचा नायक कोण असणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या, आता मात्र प्रेक्षकांच्या या उत्सुकतेला पूर्णविराम मिळणार आहे. नुकताच चित्रपटाच्या नायकाचा चेहरा प्रेक्षकांच्या भेटीस आला असून “अंकुश” नावाच्या वादळात लख्ख प्रकाश टाकण्यासाठी नवोदित अभिनेता दीपराज घुले आला आहे.
पाहा अंकुशची नवीकोरी झलक (Ankush Movie Hero)
या चित्रपटात दीपराज अंकुश सुर्वे ही मुख्य भूमिका साकारणार आहे. आलेल्या संकटाना समोर जाण्याची धमक असलेली ही भूमिका नवोदित कलाकाराने उत्तमरीत्या साकारली आहे, हे त्याच्या पोस्टरवरून समोर आलं आहे. अभिनेत्री केतकी माटेगावकर या चित्रपटात दीपराजसोबत झळकणार आहे. केतकी आणि दीपराज यांना चित्रपटात एकत्र पाहणं रंजक ठरणार आहे.
ऍक्शन आणि रोमान्स अशा दुहेरी धुरा सांभाळणारा ‘अंकुश’ हा चित्रपट लवकरच रुपेरी पडदा गाजवायला सज्ज होत आहे. दीपराज सोबत या चित्रपटात अभिनेत्री केतकी माटेगावकर, ऋजुता बागवे, अभिनेते सयाजी शिंदे, मंगेश देसाई, चिन्मय उदगीरकर, गौरव मोरे, नागेश भोसले आदी कलाकार मंडळी दिसणार आहेत.

‘ओमकार फिल्म्स क्रिएशन’ प्रस्तुत ‘अंकुश’ या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निर्माते राजाभाऊ आप्पाराव घुले यांनी सांभाळली असून चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक निशांत धापसे यांनी केलं आहे. तर चित्रपटाची कथा ही नामदेव मुरकुटे यांची आहे. ६ ऑक्टोबर रोजी हा बिग बजेट ऍक्शनपट नव्याकोऱ्या चेहऱ्यासह बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला सज्ज होणार आहे.