‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने आजवर प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा निर्माण केली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील लोकप्रिय कलाकार म्हणजे फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे. गौरवने आपल्या अचूक विनोदाच्या टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवत त्यांचं कायमच मनोरंजन केलं आहे. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून गौरवने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. परंतु खऱ्या अर्थानं त्याला लोकप्रियता मिळाली ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे. गौरवने याआधी ‘हवाहवाई’ चित्रपटात काम केलं होतं, आता यानंतर गौरव एका नव्या कोऱ्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. (Gaurav More New Movie)
काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. ‘अंकुश’ असं चित्रपटाचं नांव असून या चित्रपटातील एक एक कलाकार प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. आता ‘अंकुश’ या बिग बजेट सिनेमामध्ये अभिनेता गौरव मोरे झळकणार असल्याचं समोर आलं आहे. नुकताच ‘अंकुश’ या चित्रपटातील गौरव मोरे यांचा लूक व्हायरल झाला आहे. या चित्रपटात गौरव मोरे मंग्या दादाच्या रूपात पाहायला मिळणार आहेत. गौरवने आजवर छोटा पडदा गाजवलाच आहे, मात्र मोठ्या पडद्यावरही आता गौरव आपल्या अभिनयाची छाप पाडायला सज्ज झाला आहे.
पाहा अंकुश चित्रपटात गौरव मोरे नेमकी कोणती भूमिका साकारणार (Gaurav More New Movie)
ऍक्शन आणि रोमान्स अशा दुहेरी धुरा सांभाळणारा ‘अंकुश’ हा चित्रपट लवकरच रुपेरी पडदा गाजवायला सज्ज होत आहे. यामध्ये अभिनेत्री केतकी माटेगावकर, अभिनेते सयाजी शिंदे, मंगेश देसाई, चिन्मय उदगीरकर, गौरव मोरे आदी कलाकार मंडळी दिसणार आहे. मात्र या चित्रपटाचा नायक कोण आहे, याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे.
‘ओमकार फिल्म्स क्रिएशन’ प्रस्तुत ‘अंकुश’ या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निर्माते राजाभाऊ आप्पाराव घुले यांनी सांभाळली असून चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक निशांत धापसे यांनी केलं आहे. तर चित्रपटाची कथा ही नामदेव मुरकुटे यांची आहे. ६ ऑक्टोबर रोजी हा बिग बजेट ऍक्शनपट नव्याकोऱ्या चेहऱ्यासह बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला सज्ज होणार आहे.