बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी त्याच्या आजवरच्या भूमिकांमुळे व अभिनयामुळे कायमच चर्चेत राहिला आहे. मनोरंजन विश्वात त्याची ‘सीरियल किसर’ म्हणून ओळख असली तरीदेखील त्याने त्याच्या आजवरच्या प्रवासात विविधांगी भूमिकाही साकारल्या आहेत. इमरानने रोमँटिक नायकसह गंभीर व खलनायकाच्या भूमिका साकारत त्याचे वेगळेपण कायमच सिद्ध केले आहे. आपल्या अभिनयाने कायमच चर्चेत राहणारा अभिनेता इमरान हाश्मी सध्या त्याच्या ओटीटीवरील ‘शोटाइम’ या वेबसीरिजमुळे चांगलाच चर्चेत आहे.
‘शोटाईम’ मध्ये इमरान हाश्मीसह अभिनेत्री श्रिया सरन, महिमा मकवाना व मौनी रॉय आदी कलाकारही आहेत. ‘शोटाईम’मधून ग्लॅमरस दुनियेमागची खरी कहाणी दाखवण्यात आली आहे. या सीरिजच्यानिमित्ताने इमरान सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी त्याने अभिनेत्री कंगणा रनौतच्या बॉलीवूडमधील घराणेशाहीवर तसेच ड्रग्स वापराबाबतच्या व्यक्तव्यांवर भाष्य केले आहे. यावेळी इमरानने कंगणाबद्दल त्याचे मत परखडपणे मांडले आहे.
इमरानने कंगनाबरोबर ‘गँगस्टर’मध्ये काम केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. येथून कंगनाने यशाच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. या अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीत बाहेरची व्यक्ती बनून आपले स्थान निर्माण केले. मात्र, गेल्या काही वर्षांत कंगनाने इंडस्ट्रीतील घराणेशाहीबद्दल बरेच काही सांगितले आहे. त्याने ड्रग्ज घेण्यासह बॉलिवूड कलाकारांची अनेक गुपितेही उघड केली आहेत. आता इमरान हाश्मीने त्यांच्या दाव्याला प्रत्युत्तर दिले आहे.
इमरानने म्हणाला की, “कंगना एक कलाकार म्हणून खूप चांगली आहे आणि प्रत्यक्षातही व्यक्ती म्हणूनहे ती खूपच चांगली आहे. कदाचित तिचा या इंडस्ट्रीतला अनुभव वाईट असेल, पण इथे सगळेच लोक सारखे नसतात. कंगनाबरोबरचा माझा अनुभव असा होता की, मी ‘गँगस्टर’मध्ये खलनायकाची भूमिका साकारली आणि चित्रपटात तिला केंद्रस्थान दिले. हा जवळजवळ एक महिला केंद्रित चित्रपट होता. त्यामुळे मला माहीत नाही की, या इंडस्ट्रीबद्दल कंगनाचं मत नेमकं कधी बदललं, तिने सर्वांना नशेच्या अधीन असल्याचा दावा का केला? किंवा घराणेशाहीविरोधात ती एवढी आक्रमक का झाली? याबद्दल मलाही ठाऊक नाही”.
दरम्यान, इमरानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो अलीकडेच सलमान खानच्या ‘टायगर ३’मध्ये दिसला होता. या चित्रपटात त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांना खूप आवडली होती. आता तो लवकरच त्याच्या ‘शो टाइम’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांना या सीरिजची आतुरता लागली आहे..