“हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे” असं म्हणत प्रेक्षकांना हसायला भाग पाडणारा अभिनेता व लेखक निलेश साबळेने ‘चला हवा येऊ द्या’ या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. ‘चला हवा येऊ द्या’ या शोने गेली १० वर्षे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. निलेश साबळेसह शोमधील भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, अंकुर वाढवे आदी कलाकारांनी चांगलीच रंगत आणली. मात्र नुकताच या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला. अशातच निलेशने नुकतीच त्याच्या नवीन कार्यक्रमाची घोषणा केली.
‘झी मराठी’वरील ‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शोमधून एक्झिट घेतल्यानंतर निलेश आता “हसताय ना? हसायलाच पाहिजे” हा नवा शो घेऊन येत आहे. कलर्स मराठीवर हा नवा कॉमेडी शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या शोचा प्रोमो चाहत्यांच्या भेटीला आला आहे. ”हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या कॉमेडी शोमध्ये निलेश लेखन, दिग्दर्शन व सूत्रसंचालनाची जबाबदारी पाडणार आहे. ‘कलर्स मराठी’ने आपल्या सोशल मीडिया हँडलवर नवीन शोची अधिकृत घोषणा केली आहे.
‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या शोच्या प्रोमोवर प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या नवीन शोचे स्वागत केले असून काहींनी ‘चला हवा येऊ द्या’ची आठवण काढली आहे. तर काहींनी मात्र ‘बिग बॉस मराठी’ शो सुरु करण्याची विनंती केली आहे. या प्रोमोखाली नेटकऱ्यांनी “चॅनल बदलतंय ना? बदलायलाच हवा कारण आम्ही तर पांचट जोकच करणार आहोत, आमच्यासाठी ‘चला हवा येऊ द्या’ हे इमोशन आहे, कलर्सवाले ‘बिग बॉस’ सुरु करायचं सोडून दुसऱ्यांनी बंद केलेला शो का आणत आहेत?, ‘चला हवा येवू द्या’ची प्रसिद्ध व अजरामर टॅगलाइन वापरताना काहीच नाही वाटत का तुम्हाला? फालतूपणा सोडा,” अशा कमेंट्स करत या शोबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
तर काहींनी मात्र ‘बिग बॉस’ मराठी सुरु करण्याबद्दल सुर आळवला आहे. “कृपया ‘बिग बॉस’ मराठी चालू करा, आम्हाला ‘बिग बॉस’ मराठी पाहिजे आहे, आम्हाला बिग बॉस हवं आहे, हे नाही” अशा अनेक कमेंट्सद्वारे ‘बिग बॉस’च्या चाहत्यांनी ‘बिग बॉस मराठी’चे नवीन पर्व सुरु करण्याची मागणी केली आहे. तसेच, अनेकांनी “एकसाथ तीन एक्के बाजी मारणार पक्के, खुप शुभेच्छा” असं म्हणत या नवीन शोला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ हा शो कलर्स मराठीवर येत्या २० एप्रिलपासून शनिवार-रविवार रात्री नऊ वाजता पाहायला मिळणार आहे.