मराठी सिनेसृष्टीतील दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे हे आजही लोकांच्या मनावर राज्य करतात. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकेकाळी फक्त मराठी नाही तर हिंदी सिनेसृष्टीलाही वेड लावले. लक्ष्मीकांत यांनी चंदेरी दुनियेसह रंगभूमीचे मंचदेखील गाजवले. त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत त्यांचा लेक अभिनय बेर्डे हादेखील मराठी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमठवत आहे. अभिनय बेर्डेने काही वर्षांपूर्वीच मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकलं. त्याचा ‘ती सध्या काय करते?’ हा चित्रपट बराच गाजला.
‘ती सध्या काय करते?’नंतर अभिनयने अनेक चित्रपटांतून त्याचे अभिनयकौशल्य दाखवले. ‘अशी ही आशिकी’, ‘मन कस्तुरी रे’, ‘रंपाट’, ‘बॉईज ४’ या चित्रपटांतून अभिनयने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. चित्रपटांतून मनोरंजन केल्यानंतर अभिनय आता रंगभूमीद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज झाला आहे. अभिनय आपल्या वडिलांचा वारसा चालवत रंगभूमीवर पदार्पण करणार आहे. लवकरच रंगभूमीबर अभिनयचं पहिलं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतंच या नाटकाचं पहिलं पोस्टर त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे.
अभिनय ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकातून मराठी रंगभूमीवर पदार्पण करत आहे. नुकतंच त्याने या नाटकाचे पोस्टर शेअर करत असं म्हटलं की, “तुम्हा प्रेक्षकांच्या प्रेमाने आणि आई-बाबांच्या आशीर्वादाने आज नाटकात पहिलं पाऊल टाकत आहे. माझं पाहिलं व्यावसायिक मराठी नाटक, आज्जीबाई जोरात!”. पहिलं AI महाबालनाट्य ‘आज्जीबाई जोरात’मधून अभिनय रंगभूमीवर पदार्पण करणार आहे. या नाटकाचं लेखन-दिग्दर्शन क्षितिज पटवर्धनने केलं आहे.
आणखी वाचा – “फॉलोअर्स पाहून काम गेलं अन्…”, योगेश शिरसाट यांचा मोठा खुलासा, म्हणाले, “चित्रीकरणाच्या दोन दिवसांपूर्वी…”
अभिनेता पुष्कर श्रोत्रीने अभिनयचे कौतुक करत “आपल्या वडिलांना अभिमान वाटेल असं काम करण्याची क्षमता असलेला फार प्रामाणिक व मेहनती मुलगा म्हणजे अभिनय” असं म्हटलं आहे. तसेच त्याला या नाटकासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, येत्या ३० एप्रिलपासून मराठी रंगभूमीवर हे नाटक प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज होणार आहे.