‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व नुकतेच संपले असून सूरज चव्हाण हा ‘बिग बॉस मराठी’चा विजेता झाला. सुरुवातीपासून प्रेक्षकांमध्ये या सीजनबद्दल मोठी क्रेझ पाहायला मिळाली होती. ‘बिग बॉस’च्या घरात सूरजने एन्ट्री केल्यापासून सूरजचा अनोखा अंदाज प्रेक्षकांना चांगलाच आवडताना दिसला. अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण हे ‘बिग बॉस’च्या फायनलमध्ये पोहोचले होते. पण सर्वात जास्त मत पडल्याने सूरज चव्हाण हा ‘बिग बॉस मराठी’चा विजेता झाला. सूरजच्या विजयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोस्ट शेअर करत त्याचं कौतुक होतं. यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांनी स्वत: फोन करून त्याची भेट घेतली. (Ajit Pawar Suraj Chavan Talk)
सूरज चव्हाण व अजित पवार यांच्या या भेटीदरम्यानचे काही फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सूरज ‘बिग बॉस’ची ट्रॉफी घेऊन अजित पवार यांच्या भेटीला गेला होता. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी त्याची विचारपूस केली. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार होत असताना सूरजने मोठ्या उत्साहात त्याची डायलॉगबाजी सुरू केली. सूरजची ही डायलॉगबाजी ऐकून त्यांना हसू अनावर झालं होतं. यावेळी अजित पवार यांनी ‘सूरजला व्यसन करतो का?’ असा प्रश्नदेखील विचारला.
यावेळी सूरजने अजित पवारांना उत्तर देत असं म्हटलं की, “मी कोणतेच व्यसन करत नाही. बिग बॉसच्या घरात तुम्ही मला पहिलं ना? मला कोणतेच व्यसन नाही”. यावर अजित पवारही सूरजचे कौतुक करतात. तसेच यापुढे ते त्याला शुभेच्छा देत असं म्हणतात की, “सूरजचे वागणे, बोलणे, चालणे बघून एकंदरीत अंदाज आला होता की तो यश मिळवेल आणि ते यश त्याने मिळवलं. याबद्दल आम्हा सर्वांना आनंद आहे. त्याच्या पुढच्या सर्व वाटचलीसाठी त्याला शुभेच्छा”.
दरम्यान, सूरज चव्हाण याचा अजित पवारांनी सत्कार केला. यावेळी अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी सूरजच्या प्रवासाविषयी माहिती घेतली. त्यासोबतच भविष्यात काय करणार विचारपूस करत जमेल ते सहकार्य करणार असल्याचा शब्दही दादांनी यावेळी सूरज चव्हाणला दिला.