सध्या मराठी मनोरंजन सृष्टीमध्ये ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे आणि कलाकारांकडूनही या कलाकृतींना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. बॉलिवूडलाही या ऐतिहासिक चित्रपटांची भुरळ पडली असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट सांगणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आजवर अनेक चित्रपट व मालिकांमधून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि प्रेक्षकांनीही या कलाकृतींना भरभरून प्रतिसाद दिला आहे.
‘छत्रपती संभाजी’ हा चित्रपट २ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. राकेश सुबेसिंह दुलगज निर्मित, ‘परफेक्ट प्लस एंटरटेनमेंट’ आणि ‘एजे मीडिया कॉर्प’ प्रस्तुत ‘छत्रपती संभाजी’ हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू तसेच इंग्रजी आदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. राजकारण, मुसद्देगिरी, समाजकारण व धर्मकारण यांच्यात मुरलेले छत्रपती संभाजी महाराज रणांगणावरचे शेर होते.
स्वराज्यनिष्ठा, शौर्य, धैर्य अशा अनेक अंगाने अनेक मोहिमा यशस्वी करणाऱ्या महाराजांनी निर्माण केलेला प्रेरणादायी इतिहास ‘छत्रपती संभाजी’ या चित्रपटातून तरुण पिढीला अनुभवता येत आहे आणि या कलाकृतीला प्रेक्षकांकडूनही तूफान प्रतिसाद मिळत आहे. संभाजी महाराजांबद्दलचा धगधगता इतिहास या चित्रपटातून पुन्हा नव्याने जाणून घेता आला, त्यांचा खरा इतिहास आम्हाला या चित्रपटाद्वारे जाणून घेण्यात मदत झाली, प्रत्येक कलाकाराचे काम त्याचबरोबर या चित्रपटाचे संगीत आवडल्याचेही अनेक प्रेक्षकांनी म्हटले आहे.
दरम्यान, ‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाची सहनिर्मिती एफआयएफ निर्मिती संस्थेची आहे. कथा सुरेश चिखले यांची आहे. छायांकन सुरेश देशमाने तर संकलन भरत भाई यांचे आहे. कला अनिल वठ यांची आहे. साहसदृश्ये पी. सतीश यांची आहेत.