आपल्या जीवनातील प्रत्येक लहानसहान गोष्टींबरोबर आपल्या प्रत्येकाच्या काही खास आठवणी असतात. आपल्या आयुष्यातील काही गोष्टी किंवा प्रसंग मनाच्या खूपच जवळचे होऊन जातात आणि कॉलेज हा आपल्या प्रत्येकाच्याच मनाच्या जवळचा विषय आहे. कालांतराने आपण कॉलेजमध्ये शिकून बाहेर पडल्यानंतर आपपल्या आयुष्यात व्यस्त होतो आणि नकळतपणे कॉलेज व कॉलेजच्या आठवणी मागे पडत जातात. बरेच जण गप्पांमध्ये आपल्या कॉलेजचे दिवस आठवतात. पण फार कमी लोक आपल्या कॉलेजला भेटी देत असतात. अशापैकी काही कलाकार म्हणजे अभिनेता अंकुश चौधरी व अभिनेत्री दीपा चौधरी.
अंकुश व दीपा ही दोघेही परेलच्या एम.डी. (महर्षी दयानंद कॉलेज)चे विद्यार्थी. कॉलेजमध्ये स्पर्धांमधून अभिनय करत या जोडीने आज मराठी मनोरंजन सृष्टीत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रसिद्धीच्या व लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचूनदेखील त्यांची आपल्या कॉलेजप्रती असलेली नाळ अजूनही तुटलेली नाही आणि याच कॉलेजच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी अंकुश-दीपा यांनी त्यांच्या कॉलेजला भेट दिली आहे.
अंकुश व दीपा हे दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सोशल मीडियाद्वारे ते त्यांच्या चाहत्यांच्या संपरकार राहत असतात. अशातच दोघांनी त्यांच्या कॉलेजला भेट दिली आणि याचे काही खास क्षण त्यांनी चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. यात अंकुश-दीपा यांनी कॉलेजचा परिसर, कट्टा व संपूर्ण कॉलेजची झलकही दाखवली आहे.
या व्हिडीओमध्ये अंकुशने असे म्हटले आहे की, “आम्ही खूप वर्षांनी आमच्या कॉलेजमध्ये आलो आहोत. १९९३ मध्ये आम्ही इथे शिकायला होतो आणि आता आम्ही या कॉलेजमध्ये आलो आहोत. या व्हिडीओमध्ये अंकुशने तो कॉलेजमध्ये असताना नेहमी बसणाऱ्या कट्टा दाखवत आम्ही आमच्या कॉलेजच्या दिवसांत इथे बसून टाइमपास करायचो असंही म्हटलं आहे. तसेच या व्हिडीओला आठवणींना उजाळा असं हटके कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान, या व्हिडीओला नेटकऱ्यांनी देखील लाइक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.