मुकेश अंबानी व नीता अंबानी यांच्या घरी सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. मुकेश व नीता यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटसह लग्नबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी या जोडप्याच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती, ज्यामध्ये १ मार्च ते ८ मार्च दरम्यान लग्नपूर्वीचे विधी संपन्न होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांची नेमकी कमाई किती व त्यांचे नेमके काम काय, याबाबत जाणून घेऊया. (Anant Ambani and Radhika Merchant Net Worth)
मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचे शालेय शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून झाले. त्याने अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. यानंतर तो मुंबईत परतला आणि वडिलांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीमध्ये काम करु लागला. ‘डीएनए’च्या रिपोर्टनुसार अनंत अंबानींची एकूण संपत्ती ३,४४,000 कोटी रुपये इतकी आहे.
इतकंच नव्हे तर राधिका मर्चंटही तिच्या भावी पतीला कमाईच्या बाबतीत टक्कर देते. राधिका प्रसिद्ध उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. तिचा जन्म गुजरातमधील कच्छ येथे झाला. राधिकाने ‘कॅथेड्रल अँड जॉन कॉनन’ व ‘इकोले मोंडियाल वर्ल्ड, मुंबई’ येथून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. न्यूयॉर्क विद्यापीठातून तीने राजकारण व अर्थशास्त्र या विषयात पदवी पूर्ण केली. ही पदवी प्राप्त केल्यानंतर राधिका मायदेशी परतली. त्यानंतर आता ती विक्री व्यावसायिक म्हणून रिअल इस्टेट फर्ममध्ये काम करत आहे.
राधिकाच्या एकूण संपत्तीबाबत कोणतीही विशेष माहिती समोर आलेली नाही. तिचे वडील वीरेन मर्चंट हे प्रसिद्ध उद्योगपती आहेत. GQ नुसार त्यांची एकूण संपत्ती ७५५ कोटी रुपये आहे. राधिकालाही नृत्याची खूप आवड आहे. ती एक उत्कृष्ट भरतनाट्यम नृत्यांगना आहे. ‘जिओ वर्ल्ड सेंटर’च्या शुभारंभावेळी तिने पहिल्यांदा सादरीकरण केले.
राधिका-अनंत यांची एंगेजमेंट गेल्या वर्षी अँटिलिया येथे झाली होती. ज्यामध्ये बॉलिवूड स्टार्ससह अनेक बड्या व्यक्तींनी हजेरी लावली होती. सध्या दोघांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. अनंत व राधिकाच्या लग्नापुर्वीच्या विधींमध्ये रणबीर कपूर व आलिया भट्ट जबरदस्त परफॉर्मन्स देणार असल्याच्या बातम्या आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला ज्यात आलिया-रणबीर अंबानी कुटुंबाच्या घरी जाताना दिसत आहेत.