‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. कुशलने आजवर त्याच्या विनोदी भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. विनोदाच्या उत्तम टायमिंगने कुशलने सिनेसृष्टीतील स्वतःच स्थान स्वतः कमावलं. याशिवाय कुशल मराठी चित्रपट व वेबसीरिजमधूनही प्रेक्षकांच्या भेटीस आला. सोशल मीडियावर कुशल बऱ्यापैकी सक्रिय असलेला नेहमीच पाहायला मिळतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो काही ना काही पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. (Kushal Badrike Valentine Special Post)
कुशल सोशल मीडियावर त्याच्या बायकोसाठीही बऱ्याच पोस्ट करताना दिसतो. अशातच खास व्हॅलेंटाईन डेचे औचित्य साधत कुशलने शेअर केलेल्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कुशलने त्याची पत्नी सुनैना साठी ही खास पोस्ट शेअर केली आहे. सुनैना व कुशल यांचा प्रेमविवाह आहे. अधूनमधून कुशल त्याच्या बायको, मुलाबरोबरचे फोटो पोस्ट करताना दिसत असतो.
व्हॅलेंटाईन डेचे औचित्य साधत कुशलने त्याच्या बायकोबरोबरचा खास फोटो शेअर केला आहे. या पोस्टसह त्याने लिहिलं आहे की, “तुमच्या सोबत झालं आहे का कधी असं?, एखादं माणूस आपल्या समोर येतं आणि जगात फक्त आपलंच घड्याळ slow motion मध्ये धावायला लागतं. न्यूटनने लावलेला गुरुत्वाकर्षणाचा शोध फाट्यावर मारून आपण एकदम तरंगूच लागतो. जत्रेतल्या चष्मेवाल्याकडचा ‘गुलाबी गॉगल’ चढवल्यासारखं फक्त आपलंच जग गुलाबी होऊन जातं आणि जत्रेतला पाळणा अजूनही slow motion मध्ये धावत आपल्या घड्याळात अडकून पडलेला असतो. बास बास तुमचा व्यवहारी जगाशी संबंध संपला, राजाहो तुम्ही प्रेमात आहात, आता slow motion मधील जत्रेतलं पाळणा आणि तुमच्या मनगटावरचं घड्याळ रुळावर आणायची चावी समोरच्या माणसाकडे आहे. देव तुमचं भलं करो” असं म्हणत सुनैनाला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कुशलची ही पोस्ट चाहत्यांना पसंत पडली असून अनेकांनी कमेंट करत दोघांनाही शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळत आहेत. कुशलच्या या पोस्टवरुन कुशल व त्याच्या बायकोसाठी यंदाचा व्हॅलेंटाईन डे खास असल्याचं समोर आलं आहे.