व्यक्ती प्राणिप्रेमी असो वा नसो, प्रेम ही भावना प्रत्येकाच्या मनात असतेच. त्यात जर तुम्ही प्राणीप्रेमी असाल मग ही भावना आणखीनच उत्कट होते. मराठी मनोरंजन सृष्टीतही अनेक प्राणीप्रेमी कलाकार आहेत. त्यापैकीच यके कलाकार म्हणजे अभिनेत्री जुई गडकरी. जुई ही खूप मोठी प्राणी प्रेमी असून तिच्या घरी अनेक मांजरी आहेत. यावरून तिचं प्राणीप्रेम दिसून येतेच. त्यामुळे तिला एखाद्या प्राण्याला झालेल्या त्रासाविषयी हलहल वाटणे हेदेखील तितकेच साहजिक आहे.
ठाण्यात मुक्या प्राण्यांच्या ग्रूमिंग सेशन सेंटरमध्ये कर्मचाऱ्याने एका श्वानाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पाळीव प्राण्यांची शुश्रूषा करणाऱ्या सेंटरमध्ये श्वानाला मारहाण करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. हा धक्कादायक प्रकार पाहून मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नुकतीच रितेश देशमुखने यावर प्रतिक्रिया व्यक्त करत मारहाण करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याची मागणी केली होती. अशातच आता अभिनेत्री जुई गडकरीनेही यावर संताप व्यक्त केला आहे.
जुईने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “एका स्पा सेंटरमध्ये श्वानाला मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अतिशय अस्वस्थ करणारा आहे. मी तो व्हिडीओ पूर्ण पाहूदेखील शकले नाही. मारहाण करणाऱ्या त्या मनोरुग्णाला देव नक्कीच चांगली शिक्षा करेल. ज्या हातांनी त्याने मुक्या जीवाला मारहाण केली, ते हात काहीच कामाचे राहणार नाहीत.”
यापुढे तिने “कृपया हा अत्याचार थांबवा. त्या कर्मचाऱ्याला अटक करा व त्याला कठोर शिक्षा करा.” असे काही हॅशटॅग्सही लिहिले आहेत. तसेच यापुढे तिने “मी आशा करते की, तो श्वान आता सुरक्षित असेल. कृपया यापुढे तुमच्या प्राण्यांना अशा क्लिनिक अथवा स्पा सेंटरमध्ये एकटं पाठवू नका. त्यांची काळजी घ्या” असं म्हटलं आहे. दरम्यान, या व्हायरल व्हिडीओवर अनेक नाटकऱ्यांनी कमेंट्स करत संताप व्यक्त केला असून त्या व्यक्तीला अटक करण्याची मागणी केली आहे.