‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली. सर्वच कलाकारांनी संपूर्ण महाराष्ट्राला अगदी खळखळून हसवलं. १० वर्षांनी या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. प्रेक्षक देखील या कार्यक्रमाला खूप मिस करत आहेत. या कार्यक्रमातील एक लोकप्रिय अभिनेते म्हणजे भाऊ कदम. विनोदाचे अचूक टायमिंग, चपखल अभिनय यामुळे त्यांना अधिक प्रसिद्धी मिळाली. त्यांचे महाराष्ट्रात लाखों चाहते आहेत. भाऊ हे त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आले आहेत. (actor bhau kadam )
भाऊ यांनी अनेक मालिका, चित्रपटाबरोबरच अनेक नाटकांमध्येही काम केले आहे. त्यांनी नाटक करतानाचा एक मजेशीर किस्सा प्रेक्षकांबरोबर शेअर केला आहे. त्यांनी एका नाटकावेळची आठवण सांगताना म्हणाले की, “अभिनेते संजय नार्वेकर यांच्याबरोबर ‘बाजीराव मस्त मी’ हे नाटक करत होतो. त्या नाटकात एक ब्लॅक आऊट व्हायचा आणि त्यावेळी मी कपडे बदलून यायचो. ही सर्व क्रिया खूप पटापट व्हायची. त्यावेळी मला लेंगा व सदरा घालायचा होता. मी ते घालून स्टेजवर लगेच गेलो. तेव्हा माझ्याकडे संजय सरांनी पाहिलं आणि ते हसू लागले”.
पुढे ते म्हणाले की, “अचानक काय झालं हे मला समजलं नाही. नंतर माझ्या लक्षात आलं की मी लेंगा उलटा घातला होता. त्याची नाडी पुढे असण्याऐवजी मागे होती आणि सदऱ्याचा मागचा गळा पुढे होता. पण मी स्टेजवर असल्याने काहीही करु शकत नव्हतो. पण ती भूमिका हॉस्पिटलमधून पळालेल्या वडिलांची भूमिका असल्याने इतके वेगळे काही वाटले नाही. ही गोष्ट फक्त आमच्याच लक्षात आली होती”.
हा किस्सा सांगताना त्यांनी या नाटकाच्या वेळच्या सर्व आठवणी ताज्या केल्या. या नाटकाच्या दरम्याने प्रेक्षकांचे मिळालेले प्रेम, संजय यांच्याबरोबर काम करण्यासाठी मिळालेली संधी यामुळे ते खूपच खुश होती. त्यांच्या ‘बाजीराव मस्त मी’ या नाटकाला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाली. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर आता ते नीलेश साबळेबरोबर ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!!’ या कार्यक्रमात दिसणार आहेत. यामध्ये त्यांच्याबरोबर अभिनेता ओंकार भोजनेची धमाल कॉमेडी पाहायला मिळणार आहे.