Salman Khan Threat Message : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला धमकीचे मेसेज पाठवल्याप्रकरणी तपास करत असलेल्या मुंबई पोलिसांनी जमशेदपूरमधून एका व्यक्तीला अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी बुधवारी याबाबतची माहिती दिली. शेख हुसेन शेख मौसीन (वय वर्ष २४) असे आरोपीचे नाव असून तो जमशेदपूर येथील भाजी विक्रेता आहे. गेल्या आठवड्यात सलमान खानकडून मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप हेल्पलाइनवर ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करणारा धमकीचा संदेश आला होता, त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी झारखंडचा नंबर ट्रेस केला आणि आरोपींना पकडण्यासाठी झारखंडला पथके पाठवण्यात आली. त्यांनी सांगितले की, आणखी एक टीम गुवाहाटीला पाठवण्यात आली आहे. मेसेज पाठवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी त्यांचा तपास सुरु केला, परंतु मुंबई वाहतूक पोलिसांना त्याच मोबाइल फोन नंबरवरुन माफीचा संदेश प्राप्त झाला, असे अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले.
काळवीट शिकार प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई टोळीला सलमान खानकडून माफी हवी आहे, अशी माहिती आहे. याच कारणावरुन सलमानच्या घरी गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेरही गोळीबार झाला होता. १२ ऑक्टोबर रोजी त्यांचे निकटवर्तीय बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यानंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तरीही, कामाच्या कमिटमेंटमुळे तो ‘बिग बॉस १८’, ‘सिकंदर’ आणि ‘सिंघम अगेन’ (कॅमिओ) साठी शूटिंग करत आहे.
बाबा सिद्दीकीच्या हत्येचा आणि सलमान खानचा काहीही संबंध नाही, असे सलीम खान यांनी ‘एबीपी न्यूज’शी बोलताना सांगितले. सलीम खान म्हणाले, “नाही, मला नाही वाटत त्याचा काही संबंध आहे. बाबा सिद्दीकी यांचा याच्याशी काय संबंध असेल? कोणालाही कशाचाही संबंध लावता. तुम्ही आम्हाला सलाम केला नाही तर आम्ही तुम्हाला मारुन टाकू. जर तुम्ही आम्हाला नमस्कार केला नाही तर आम्ही तुम्हाला मारुन टाकू”. सलीम खानला विचारण्यात आले की, बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती, कारण ते सलमानला लॉरेन्स बिश्नोईपासून वाचवण्याचा प्रयत्न करत होते. तर यावर सलमानचे वडील म्हणाले, “पोलीस सलमान आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला संरक्षण देत आहेत. त्यात काय आहे? प्रत्येकाला वाचायचे आहे. आयुष्य जे काही आहे ते कधीही संपू शकते”.