गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांपासून बॉलिवूडमधील कलाकार मंडळी अनेक सार्वजनिक मंडळांच्या बाप्पाचे दर्शन घेत आहे. नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी अनेक सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. शाहरुख खान, शिल्पा शेट्टी, कार्तिक आर्यन, वरुण धवनसह अनेक कलाकारांनी यंदा लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. अशातच, अभिनेता विकी कौशल, सोनू सूद, शेखर सुमन, मानुषी छिल्लर यांचा लालबागच्या राजाचे दर्शन घेतानाचा व्हिडिओ चर्चेत आले आहे. (Bollywood celebrities skips VIP treatment for Lalbaugcha Raja Darshan)
एकीकडे, लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी सर्वसामान्यांना तासनतास उभे राहावं लागतंय. त्यातही कार्यकर्त्यांसह बाचाबाचीचे अनेक प्रकारही यावर्षी घडले आहे. असं चित्र असताना सेलिब्रिटींना मिळत असलेल्या व्हीआयपी दर्शनाबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, काही कलाकारांनी व्हीआयपी दर्शन नाकारत सर्वसामान्यांच्या रांगेत उभे राहणे पसंत केले आहे.
हे देखील वाचा – Video : चाहतीच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले प्रभाकर मोरे, चाळीमध्येच शालू गाण्यावर धरला ठेका, साधेपणा पाहून होतंय कौतुक
माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर लालबागचा राजाच्या दर्शनाला गेली होती. यावेळी ती सर्वसामान्यांच्या रांगेत उभं राहिली खरी, मात्र गर्दीमुळे तिला दुरूनच बाप्पाचे दर्शन घेता आले. सोशल मीडियावर तिचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती सर्वसामान्यांच्या रांगेत उभी असल्याचं पाहायला मिळत आहे. तिच्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत कौतुक केलं आहे. एक नेटकरी यावर म्हणाला, “गर्दीत उभ्या असलेल्या भाविकांना हे माहीत नाही की, त्यांच्यामागे मिस वर्ल्ड उभी आहे”. तर आणखी एक नेटकरी यावर म्हणाला, “सर्वसामान्यांच्या रांगेतून जाण्याची हिंमत किमान तरी तिच्यामध्ये आहे. पण तिला दर्शन मिळालं नाही, हे पाहून वाईट वाटलं.”
हे देखील वाचा – ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून दाक्षिणात्य चित्रपटाची अधिकृत एंट्री, पण बॉलिवूडसह मराठी चित्रपट मागे का?
केवळ मानुषीच नव्हे, तर प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल, सोनू सूद, शेखर सुमन, फराह खान यांनी सर्वसामान्यांच्या रांगेत उभे राहत बाप्पाचे दर्शन घेतले. तेही यावेळी भाविकांच्या गर्दीत अडकले आहे. त्यांचाही व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून अनेकांनी त्यांच्या या कृतीचे कौतुक केले आहे. बाकीच्या सेलिब्रिटींनी त्यांच्या आदर्श घेण्याचे नेटकरी यात म्हणत आहे.