पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुतीची मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर जाहीर सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांना स्पेशल ट्रीटमेंट देण्यात आल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी आधी गेले. यानंतर तीनही नेते एकत्र सभास्थळी दाखल झाले. महायुतीची मुंबईत छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर ऐतिहासिक सभा पार पडली. हिंदुत्वच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांची महायुतीबरोबर मैत्री झाली असल्याने राज ठाकरे व नरेंद्र मोदी एकाच मंचावर एकत्रित आलेले बघायला मिळाले. (Abhijeet Kelkar On Raj Thackeray)
एकनाथ शिंदे यांच्या भाषणानंतर राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर भाषण केलं. त्यामुळे या महासभेची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. मोदी व्यासपीठावर आल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मागे उभे असलेल्या राज ठाकरे यांना पुढे आणलं. प्रोटोकॉल बाजूला सारुन महायुतीने राज ठाकरे यांना स्पेसल ट्रीटमेंट दिली, यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. यावेळी राज ठाकरे यांनी जनतेच्या समस्या लक्षात घेत मोदींसमोर ७ मागण्या केल्या. यामुळे अनेकांनी राज ठाकरे यांचं भरभरुन कौतुकही केलेलं पाहायला मिळालं.
अशातच आता एका मराठमोळ्या अभिनेत्याने राज ठाकरे यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केलेली पाहायला मिळत आहे. अभिनेता अभिजीत केळकरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट शेअर केली आहे. “राज साहेब ठाकरे, तुम्ही खरे साहेब”, असे कॅप्शन देत त्याने फोटवरही राजसाहेब ठाकरे असं म्हणत हार्ट ईमोजी शेअर केले आहेत. या पोस्टद्वारे अभिजीतने राज ठाकरे यांचं भरभरुन कौतुक केलं आहे. अभिजीतच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनीही कमेंट करत राज ठाकरे यांचं कौतुक केलं आहे.
छोट्या पडद्यावरील अनेक मालिका व चित्रपटामुळे अभिजीत प्रसिद्धीझोतात आला. ‘बिग बॉस’ मराठीमुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळाली. सध्या तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. नेहमीच काही ना काही शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो.