उद्योगजगतातील एक महान व्यक्तीमत्त्व रतन टाटा यांचे दु:खद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे. मनोरंजन तसेच इतर सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. मुंबईतील ‘ब्रीच कॅंडी’ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने सगळ्यांनाच दु:ख झाले आहे. अभिनेता अजय देवगणने एक महत्त्वाचा कार्यक्रम रद्द केल्याचेही सांगितले. त्याच्या या निर्णयाने सगळेच जण त्याचे कौतुक करत आहेत. अशातच आता अजून एक कलाकार खूप चर्चेत आला आहे. पंजाबी गायाक दिलजित दोसांजच्या एका कृतीने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. (diljit dosanjh on ratan tata)
दिलजितचा जर्मनी येथे एक कॉन्सर्ट सुरु होता. शो सुरु असतानाच त्याला रतन टाटा यांच्या निधनाची बातमी समजली. त्यावेळी लगेच त्याने शो थांबवला आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्याने रतन यांच्याबद्दलच्या भावनादेखील व्यक्त केल्या आहेत. तो म्हणाला की, “आतापर्यंत मला कधीही रतन टाटा यांना भेटण्याची संधी मिळाली नाही. पण त्यांच्याकडून मी खूप काही शिकलो आहे”. तसेच तो म्हणाला की, “रतन टाटा यांना सगळेच ओळखतात. आज त्यांचे निधन झाले आणि त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो”.
तसेच पुढे तो म्हणाला की, “आज रतन टाटा यांचे नाव घेणं महत्त्वाचं आहे. ते ज्या प्रकारे आयुष्य जगले, मी त्यांच्याबद्दल जितकं काही ऐकलं आणि वाचलं ते खूप प्रेरणादायी आहे. कोणीही त्यांच्याबद्दल काही चुकीचं बोललेलं मी ऐकलं नाही. त्यांनी नेहमी खूप मेहनत केली, लोकांची मदत केली आणि नेहमीच चांगले काम केले. प्रत्येकाने त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करावा”.
तसेच नंतर तो म्हणाला की, “माणसाने नेहमी सकारात्मक राहावं असं रतन टाटा यांच्याकडून नेहमी शिकायला मिळते”. हा व्हिडीओ दिलजितच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलदेखील होत आहे.