‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची जोरदार चर्चा झाली. सूरज चव्हाणने यंदाच्या पर्वाच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. सूरज चव्हाण विजयी झाला असला तरी उपविजेत्या अभिजीतने अनेकांची मनं जिंकली. सूरजच्या विजयावर अनेकांनी आनंद व्यक्त केला असला तरी अभिजीतबद्दल अनेकांनी नाराजीही व्यक्त केली आहे. बिग बॉसमधील आपल्या सहज वावराने आणि वागणुकीने अभिजीतने सर्वांचीच मनं जिंकली. ‘जेंटलमन’ हे बिरुद त्याला यामुळे मिळाले. बिग बॉसच्या घरात त्याने वेळोवेळी त्याची मतं ठामपणे मांडली. त्याचबरोबर घरात पत्नी व मुली येताच त्याची हळवी बाजूही प्रेक्षकांसमोर आली. (Bigg Boss Marathi 5 fame Abhijeet Sawant)
यावेळी अभिजीतचे त्याच्या पत्नीची असलेले खास नाते सबंध महाराष्ट्राने पाहिले. पण तुम्हाला माहीत आहे का? ‘बिग बॉस’च्या घरात सर्वांना आवडणाऱ्या अभिजीतला त्याच्या बायकोने या शोमध्ये येण्यास आधी नकार दिला होता. याबद्दल अभिजीतकी बायको शिल्पा हिने स्वत: भाष्य केलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर आल्यानंतर अभिजीतने नुकताच इट्स मज्जासही खास संवाद साधला. यावेळी अभिजीतच्या बायकोने त्याच्या स्वभावामुळे मी त्याला या शोमध्ये जाऊ नकोस असं म्हटल्याचे सांगितले.
याबद्दल शिल्पा असं म्हणाली की, “तो कोणतीच गोष्ट मला न विचारता करत नाही. सगळ्यात आधी त्याबद्दल चर्चा करतो आणि मगच काय तो निर्णय घेतो. तर त्याने मला आधी ‘बिग बॉस’बद्दल विचारलं. तेव्हा त्याला मी म्हटलं होतं की “नको जाऊ”. कारण मला जितकं ‘बिग बॉस’ समजतं, त्याप्रमाणे तिकडे सगळे भांडकुदळ असतात आणि अभिजीत खूप शांत स्वभावाचा माणूस आहे. त्याच्याशी कुणी भांडलं तर तो कितपत सहन करेल याची मला भीती होती. त्यामुळे मी आधी त्याला नाही म्हटलं होतं.”
यापुढे ती असं म्हणाली की, “नंतर आम्ही एकमेकांशी चर्चा केली, विचार केला. मग तो म्हणाला की “मला जाणून घ्यायचा आहे की मी कसं करेन किंवा जनतेला अभिजीत माणूस म्हणून कसा आहे हे कळलं पाहिजे” आणि हे अगदीच योग्य होतं. त्यामुळे मग मी म्हटलं की “तुझी इच्छा आहे तर तू जा”. तसंच यावेळी अभिजीतने माझ्या घरी माझी बायकोच माझी बिग बॉस असल्याचेही गंमतीने म्हटलं आहे.