सामाजिक मुद्दे, आजूबाजुला घडणाऱ्या घटना, इंडस्ट्रीतील महत्त्वाचे विषय याबाबत अनेक कलाकार मंडळी भाष्य करताना दिसतात. अन्याया विरोधात आवाजही उठवतात. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेत्री नीना गुप्ता. नीना प्रत्येक विषयांवर आपलं मत मांडताना दिसतात. सोशल मीडियाचाही योग्य त्या गोष्टींसाठी उत्तम वापर करतात. आताही नीना यांनी स्त्रीवादावर भाष्य केलं आहे. यावेळी मात्र त्यांनी केलेल्या वक्तव्यावर चांगलीच चर्चा रंगली आहे. “स्त्रिया नोकरी करणार तर बलात्कार होणारच” या त्यांच्या विधानाने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. नीना नक्की काय म्हणाल्या? हे सविस्तर जाणून घेऊया. (Neena Gupta On Feminism)
नीना गुप्ता नक्की काय म्हणाल्या?
नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार एका मुलाखतीदरम्यान नीना यांनी स्त्रीवादावर भाष्य केलं. महिलांच्या रुपात जन्म घेणं शाप असल्याचंही त्या म्हणाल्या. लिली सिंह यांना दिलेल्या मुलाखतीत नीना म्हणाल्या की, “माझ्यासाठी स्त्रीवाद म्हणजे मनातून मजबूत असणं. माझ्यासाठी हाच स्त्रीवाद आहे”. या देशातील महिलांसाठी तुम्ही काय मागाल? असंही नीना यांना विचारण्यात आलं. तेव्हा त्या म्हणाल्या, “मला जे हवं आहे ते कधीच शक्य होणार नाही. स्त्रिया सुरक्षित असल्या पाहिजे इतकंच वाटतं. पण ते कदापी शक्य नाही”.
आणखी वाचा – रक्तस्त्राव, मृत्यूशी झुंज अन् डॉक्टरांची पाठ; पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यूला जबाबदार कोण?
“महिलांनी नोकरी केल्यास बलात्कार होणार”
नीना पुढे म्हणाल्या, “महिलांना सुशिक्षित करा असं सतत म्हणतात. पण महिलांनी जर शिक्षण घेतलं तर त्या नोकरी करणार. नोकरी केल्यानंतर त्यांचा बलात्कार होणारच. महिलांच्या रुपात जन्म घेणं एक शापच आहे. जर ती महिला गरीब असेल तर त्याहूनही वाईट. बाहेर इतकी वाईट परिस्थिती आहे की, अंगावर काटा येतो”.
नीना यांनी पुढेही आपलं बोलणं सुरु ठेवलं. त्या म्हणाल्या, “जर मला खऱ्या परिस्थितीची माहिती आहे तर आशादायक बोलणं चुकीचं ठरेल. हा मोठा शापच आहे. झोपड्यांमध्ये राहत असलेल्या महिलांबरोबर काय होतं?. मला यावर कायतरी मार्ग हवा आहे. पण काय करावं?, कोणता उपाय असेल? काहीच सुचत नाही”. नीना यांनी परखड शब्दांत मांडलेली अवस्था सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरत आहे.