Marathi Actor Vilas Ujawane Death : मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे आज (४ एप्रिल) निधन झाले. विलास उजवणे यांच्या निधनाची बातमी समोर येताच संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्यामुळे कलाविश्वामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. विलास उजवणे यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान अमुल्य आहे. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मात्र काही वर्षांपूर्वी ब्रेन स्ट्रोकने विलास घेरले. आज त्यांच्या जाण्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.२०२२ मध्ये विलास उजवणे यांच्या मित्राने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. ज्यामध्ये काही गोष्टी नमूद करण्यात आल्या होत्या.
विलास यांना काही वर्षांपूर्वी ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारांमध्ये त्यांची संपूर्ण कमाई संपली. विलास यांना आर्थिक मदत करा असे आवाहन त्यांचा मित्राने पोस्टद्वारे केले होते. मित्राने विलास व त्यांच्या पत्नीच्या सहमताने मदत मागितली होती. अखेरीस मृत्यूशी त्यांची सुरू असलेली झुंज अपयशी ठरली.विलास उजवणे यांनी ‘चार दिवस सासूचे’, ‘दामिनी’, ‘वादळवाट’ यांसारख्या मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या. प्रेक्षकांनीही त्यांना अगदी डोक्यावर उचलून धरलं.
आणखी वाचा – “महिला नोकरी करणार तर बलात्कार होणारच”, नीना गुप्तांचं वादग्रस्त विधान, यामागचा हेतू काय?
डॉ. विलास उजवणे यांचा जन्म १६ डिसेंबर १९६४ रोजी नागपूर येथे झाला. शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. शालेय तसेच महाविद्यालयीन आयुष्यात त्यांनी एकांकिकांमध्ये काम केलं होतं. आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात पुण्यातून केली. पुण्यात व्यावसायिक नाटकांमध्ये काम केल्यावर ते मुंबईत आले आणि इथून त्यांचा मालिकाविश्वातील प्रवास सुरु झाला. २०२२ मध्ये त्यांना ‘सांस्कृतिक कलादर्पण गौरवरजनी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.