‘द केरला स्टोरी’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे अदा शर्मा. अदाने या चित्रपटात केलेल्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. आजपर्यंत अदाने अनेक गंभीर आशय असणाऱ्या चित्रपटामध्ये भूमिका करताना दिसली आहे. सध्या तिचा ‘बस्तर : द नक्सल स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटातील भूमिकाकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. पण हा चित्रपट म्हणावी तशी कामगिरी करु शकला नाही. पण अशातच तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. (Ada sharma on twitter post)
नुकतीच अदा मुंबईमध्ये रमजान निमित्ताने राजकीय नेते बाबा सिद्दीकी यांनी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीसाठी अदादेखील उपस्थित राहिली होती. ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामध्ये मुलींना व महिलांना फसवून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त केले जात असल्याची गोष्ट सांगितली आहे. आता मात्र इफ्तार पार्टीमध्ये अदाला पाहून लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
On odd and even days dear sir terrorists are villains . Not muslims.
— Adah Sharma (@adah_sharma) March 26, 2024
‘एक्स’वर ट्विट करत एका नेटकाऱ्याने लिहिले आहे की, “ही किती फ्रॉड आहे! या लोकांसाठी इतर दिवशी मुसलमान असतात आणि त्यांच्या विरोधात चित्रपट बनवतात. पण काही दिवसांसाठी मात्र हे लोक त्यांना चांगले वाटत कारण त्यांना बिर्याणी खाण्यासाठी आमंत्रित केले जाते”.
नेटकाऱ्याच्या या विधानावर अदानेदेखील रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. तिने लिहिले की, “प्रिय सर, कोणताही दिवस असला तरीही दहशतवादी खलनायक असतात, मुसलमान नाही”. त्यावर एका नेटकाऱ्याने प्रतिक्रिया दिली की, “मॅडम प्लीज, मुसलमानांच्या विरोधात प्रोपोगांडा असलेला चित्रपट बनवू नका. मी तुमचा मोठा चाहता होतो”. त्यावर अदाने उत्तर दिले की, “दहशतवाद्यांच्या विरोधात चित्रपट बनवला आहे. मला विश्वास आहे की तुम्हीही त्यांच्या विरोधात असाल”.
अदाच्या या प्रतिक्रियेवर अनेकांनी तिला पाठिंबा दिला आहे. दरम्यान तिचा ‘बस्तर-द नक्सल स्टोरी’ हा चित्रपट अमरनाथ झा यांनी लिहिला असून सुदीप्तो सेनने दिग्दर्शन केले आहे. याचित्रपटात तिच्याबरोबर राइमा सेन, शिल्पा शुक्ला, यशपाल शर्मा आदी कलाकार समाविष्ट आहेत.