सध्या देशभरात कोलकाता बलात्कार व हत्येप्रकरणी सगळ्यांच्याच संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काही दिवसांपूर्वी शिकाऊ डॉक्टरवर रुग्णालयातच सेमिनार हॉलमध्ये विश्रांतीसाठी गेली असता तिच्यावर बलात्कार करुन हत्या करण्यात आली. यावरुन देशात आंदोलन, संप सुरु असून आरोपीना मृत्यूदंड देण्यात यावा यासाठी मागणी केली जात आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडियामार्फत संताप व्यक्त करत आहेत. अनुष्का शर्मा, आलिया भट्ट, ट्विंकल खन्ना, करीना कपूर यांच्यासहित अनेक बॉलिवूडकरांनी आरोपीना शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. अशातच आता अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनीदेखील या घटनेवर भाष्य केले आहे. (mithun chakraborty and shatrughan sinha on kolkata rape case)
कोलकाता बलात्कार प्रकरणाने सगळ्यांचीच झोप उडवली आहे. या घटनेची तुलना दिल्ली येथे घडलेल्या निर्भया बलात्कार प्रकरणाशी केली जात आहे. यामध्ये आता मिथुन यांनी संताप व्यक्त केला असून या विरोधात आवाज उठवला आहे. त्यांनी बंगाली असल्याबद्दल लाज वाटत असल्याचेही सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, “मी अनेकदा सांगितले आहे की येणाऱ्या दिवसांत पश्चिम बंगालची अवस्था बिकट असणार आहे. बंगाली होण्यावर आम्ही आता मान वर करुन चालू शकत नाही”.
पुढे ते म्हणाले की, “माझ्या संवेदना डॉक्टर कुटुंबाच्या समवेत आहेत. या घटनेतील सगळ्या आरोपींना शिक्षा मिळाली पाहिजे ही एकच माझी इच्छा आहे”. मिथुन हे बीजेपीचे खासदार होते. त्यांनी आता राज्यातील कायदा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
याबरोबरच शत्रुघ्न सिन्हा यांनीदेखील या प्रकरणावर भाष्य करत सोशल मीडियावर आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी X वर लिहिले की, “डॉक्टरांनी असं रस्त्यावर उतरुन आंदोलन करणे योग्य नाही. सरकार व इतरांनी केलेल्या मागण्यांवर लक्ष देणे गरजेचे आहे. पण रस्त्यावर उतरणाऱ्या डॉक्टरांना ही विनंती आहे की त्यांनी गरीब, गरजू लोकांचा विचार करावा. त्यांचे यामुळे नुकसान होऊ शकते. या सगळ्या आंदोलनामुळे आजारी लोकांना अजून त्रास होऊ शकतो”.
दरम्यान आता या सगळ्या प्रकरणात कोणते पाऊल उचलले जाणार आणि आरोपींना काय शिक्षा होणार? याकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले आहे.