‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. सबंध महाराष्ट्राला खळखळवून हसवणाऱ्या या कार्यक्रमाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात भुरळ घातलेली पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील ही कलाकार मंडळी त्यांच्या विनोदी कलेने प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करत असतात. ही कलाकार मंडळी साऱ्यांना हसवत धुमाकूळ घालताना दिसतात. ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोचे लाखो दिवाने चाहते आहेत. गेली सहा वर्ष हा शो सातत्याने प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करतोय. (Samir Choughule On Maharashtrachi Hasyajatra)
परदेशातील प्रेक्षकांनाही हसवण्यासाठी ही हास्य जत्रेची टीम परदेशवारी करताना दिसते. हास्य जत्रेतील नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, समीर चौगुले, निखिल बने, इशा डे, रसिका वेंगुर्लेकर ही कलाकार मंडळी धमाल करत प्रेक्षकांचं मन जिंकतात. हास्यजत्रेमुळे कायमच चर्चेत असणारा अभिनेता समीर चौघुलेच्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. समीर चौघुले सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो.
आणखी वाचा – श्रेयस तळपदेच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली, अभिनेता भडकला, म्हणाला, “मुलीला त्रास होतोय कारण…”
अशातच समीर यांनी सोशल मीडियावरुन महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोला ६ वर्ष पूर्ण होताच एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने “आज हास्यजत्रा सुरु होऊन ६ वर्षे झाली. ८५० भाग पूर्ण झाले. ६ वर्षे रसिकांच्या प्रेमाची व आशीर्वादाची, आमच्या अथक, प्रामाणिक मेहनतीची. रसिक मायबाप आणि आमच्यात सुरु झालेल्या अतूट नात्याची. ‘सोनी मराठी’ वाहिनीने दाखवलेल्या विश्वासाची, गोस्वामीसर आणि मोटेसरांनी केलेल्या मार्गदर्शनाची. ६ वर्षे खूप काही शिकण्याची, धडपडण्याची, ठेच लागण्याची आणि पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी मारण्याची. ६ वर्षे नैराशेत गेलेल्या अनेकांना कळत नकळतपणे बाहेर काढण्याची आणि त्यांचे हसणारे चेहरे बघून भरुन पावण्याची”.
पुढे त्यांनी लिहिलं आहे की, “६ वर्षे सामान्यांना बसणारे धक्के चिडचिड सहन करण्याची ताकद मिळवून देण्याची. ६ वर्षे अजूनही हवेत न उडता खूप काही करायचं आहे. लोकांना आणखी हसवून त्यांना आनंद मिळवून द्यायचा आहे हे सातत्याने वाटण्याची. ही ६ वर्षे आनंदाची, अभिमानाची, समाधानाची. खूप खूप धन्यवाद. आमचे सर्व लेखक आणि सर्व जगात भारी अतरंगी सहकलाकार. हास्यमेव जयते”, असं म्हणत खास पोस्ट शेअर केला आहे. तर नम्रता संभेरावनेही पोस्ट शेअर करत, “महाराष्ट्राची हास्यजत्रा मोठा प्रवास ८५० भागांचा. ६ वर्षे अभिमानाची, सुखाची, भरभराटीची ‘सोनी मराठी’ बरोबरच्या नात्याची आणि हा प्रवास प्रेक्षकांशिवाय शक्य नव्हता. तुमचं अतोनात प्रेम जिव्हाळा आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हसू हीच आमच्या कामाची पावती. हास्यजत्रेमुळे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलो. खूप भारी वाटतंय. तुमचं आमच्यावरच प्रेम असंच राहू द्या कायम”, असं म्हटलं आहे.