गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अक्षय कुमार चांगलाच चर्चेत आहे. नुकताच तो ‘बडे मियां छोटे मियां’च्या निमित्ताने लखनऊ येथे अभिनेता टायगर श्रॉफसह दिसला होता. त्यानंतर तो उदयपुर येथील एका मुलींच्या वसतीगृहाच्या उद्घाटनप्रसंगीही दिसला असून या वसतीगृहासाठी त्याने १ कोटी रुपये दान केल्याची माहिती मिळाली होती. अक्षय हा त्याच्या अभिनयाबरोबरच सामाजिक कामासाठीही आपला खूप वेळ देत असतो. मात्र आता अभिनय, सामाजिक सेवा या व्यतिरिक्त राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सर्वत्र होत आहेत. (Actor akshay kumar on election)
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय आता राजकारणात प्रवेश करणार असून येत्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाकडून निवडणुका लढवू शकतो. सध्या देशभरात निवडणुकांचे वारे वाहत असून प्रत्येक पक्षाने आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीमध्ये ४ जागांसाठी निवडणूक लढवली जाणार आहे तर कॉँग्रेसतर्फे ३ जागा लढवण्यात येणार आहेत. दिल्लीमध्ये एका नवीन चेहऱ्याला संधी देणार असून यासाठी अक्षयची निवड केली जाऊ शकते. याआधी भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी २०१४ ते २०१९ यादरम्यान दोन वेळा या जागेवर निवडून आले होते.
‘नवभारत टाइम्स’च्या वृत्तानुसार अक्षय दिल्लीतील चांदणी चौकच्या जागेसाठी भाजपद्वारा निवडणुकीसाठी उभा राहू शकतो. भाजप पक्षातील काही नेतेमंडळी याबाबत त्याच्याशी चर्चेत असल्याचे बोलले जात आहे. मात्र याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.अक्षयचे सुरवातीपासूनच भाजपशी चांगले संबंध आहेत. कोरोनाकाळादरम्याने अक्षय व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक मुलाखतही खूप गाजली होती.
दरम्यान अक्षयचे चित्रपट गेल्या काही काळापासून बॉक्स ऑफिसवर म्हणावी तितकी जादू करताना दिसत नाही आहेत. सध्या तो त्याच्या ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून या चित्रपटाकडून त्याला खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर टायगर श्रॉफ,सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर,अलाया एफ व पृथ्वीराज सुकुमारन् मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट ९ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.