बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते म्हणजे धर्मेंद्र. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या कलाकारांच्या यादीत या अभिनेत्याचं नाव आवर्जून घेतलं जातं. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ते नेहमीच त्यांचे प्रत्येक लहान-मोठे अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतात. अशातच सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या त्यांच्या एका फोटोने चाहत्यांना धक्का बसला आहे. विस्कटलेले केस, पायात बँडेज व हातात कोरडी भाकरी असलेला धर्मेंद्र यांचा हा लूक पाहून चाहत्यांना प्रश्न पडला आहे. (Dharmendra Viral Photo)
धर्मेंद्र यांनी शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास स्वतःचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. चाहत्यांचे लक्ष त्यांच्या पायाकडे जाताच सर्वांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला सुरुवात केली. यावेळी चाहत्यांना उत्तर देत त्यांनी त्याच्या पायाचे हाड तुटले असल्याचं सांगितलं.
ट्विटरवर पोस्ट शेअर करत धर्मेंद्र यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मध्यरात्र झाली आहे झोप येत नाही. भूक लागली आहे. मित्रांनो, शिळी भाकरी लोण्याबरोबर खूप चविष्ट लागते. हा हा हा”. अभिनेत्याची ही पोस्ट सोशल मीडियावर येताच त्यांच्या चाहत्यांनी यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. मात्र, धर्मेंद्र यांनी चाहत्यांना उत्तर देण्यास उशीर केला नाही. कमेंट करत अनेक चाहत्यांनी अभिनेत्याच्या उत्तम आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाही केली.
धर्मेंद्र हे अशा अभिनेत्यांपैकी एक आहेत जे वयाच्या ८८व्या वर्षीही प्रत्येक कार्यात सक्रिय राहतात. गेल्या वर्षी ते ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटातील त्यांचा किसिंग सीन विशेष चर्चेत राहिला. त्यानंतर २०२४मध्ये त्यांचा ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यानंतर आता धर्मेंद्र आणखी दोन चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. यामध्ये ‘अपने २’ व ‘इक्किस’या चित्रपटांचा समावेश आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘इक्किस’मध्ये धर्मेंद्र अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदासह दिसणार आहेत.