आज होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी एक दिवस म्हणजेच काल (मंगळवार, १९ नोव्हेंबर) रोजी भाजपचे विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप झाल्याने राजकीय खळबळ उडाली. विरारच्या एका हॉटेलमध्ये विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातला. विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील विवांता हॉटेलमध्ये विनोद तावडे आले होते. ते हॉटेलमध्ये महिलांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. (Hemant Dhome on Vinod Tawde Money Sharing Video)
ही गोष्ट सर्वत्र पसरली आणि कार्यकर्ते हॉटेलमध्ये जमू लागले. ‘ब. वि. आ.चे कार्यकर्ते हॉटेलमध्ये शिरले आणि वादावादी सुरु झाली. काही वेळातच आमदार क्षितीज ठाकूरदेखील हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी हॉटेलमध्ये सापडलेली पैशांची पाकिटे तावडे यांना दाखवली. यावेळी भाजप आणि ब. वि. आ. कार्यकर्ते आपापसात भिडले. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. अशातच सुप्रसिद्ध मराठी अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमेनेदेखील या प्रकरणी एक पोस्ट शेअर केली आहे.
निवडणूक, लोकशाही हे सारं म्हणजे…
— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) November 19, 2024
‘विनोद’ नाही गड्या!
मंडळी उद्या विचार करून मतदान करा!
यांच्या ‘तावडे’ तून महाराष्ट्राला सोडवा! #कोणाचा_गेम_कोणाला_फेम #वसईविरार #vasaivirar #MaharahstraElection2024
आणखी वाचा – ‘पारू’ फेम शरयू सोनावणेने शेअर केली लग्नाची गोड आठवण, म्हणाली, “पहिल्या दिवसापासूनच…”
हेमंत ढोमेने या घटनेबद्दल खोचट शब्दांत ट्विट केलं असून याबरोबरच विचार करुन मतदान करा, असे आवाहनही केलं आहे. हेमंत ढोमेनं ट्विट करत म्हटलं आहे की, “निवडणूक, लोकशाही हे सारं म्हणजे ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’ तून महाराष्ट्राला सोडवा”. तसंच “कोणाचा गेम कोणाला फेम” व “वसई विरार” आणि महाराष्ट्र निवडणूक २०२४” ही हॅशटॅग्सदेखील लिहिले आहेत.
दरम्यान, संतप्त झालेल्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरले. पैशांची पाकिटे पकडून त्यातील पैसे तावडे यांच्या अंगावर फेकले. तावडे यांनी या आरोपांचा इन्कार केला आहे. निवडणुकीच्या मतदानाचे नियम काय असतात ते सांगत होते. मी आयुष्यात कधी पैसे वाटले नाही, असे विनोद तावडे यांनी सांगितले.