भारताचे लोकप्रिय व ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रेहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानू यांनी लग्नाच्या २९ वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. १९ नोव्हेंबर २०२४ रोजी वकिलांनी एक निवेदन जारी करत दोघांच्या घटस्फोटाची माहिती दिली आहे. वकील वंदना शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘नात्यातील भावनात्मक तणावानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे’. शिवाय खुद्द ए. आर. रहमान यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत घटस्फोटाची घोषणा केली आहे. एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) ए. आर. रहमान यांनी एक पोस्ट शेअर करत “लग्नानंतर ३० वर्ष पूर्ण करू अशी अपेक्षा होती. पण प्रत्येक गोष्टीचा एक अनोखा अंत असतो असं वाटत आहे”. असं म्हटलं. (A. R. Rahman and Saira Bano Divorce)
अशातच आता ए. आर. रहमान यांच्या तिन्ही मुलांनी पालकांच्या विभक्त होण्याच्या निर्णयावर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे. ए. आर. रहमान आणि सायरा बानो यांचे १९९५ मध्ये लग्न झाले. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. मुलगी रहिमाने तिच्या वडिलांनी शेअर केलेलीचे पोस्ट शेअर करत “तुमच्या प्रार्थनेत आम्हाला लक्षात ठेवा” असं म्हटलं आहे. त्याचबरोबर तमिळमध्ये लिहिलेला एक संदेशही शेअर केला, ज्यामध्ये लोकांना त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे आणि लोकांना असेही सांगण्यात आले की, ही त्यांची वैयक्तिक बाब आहे.
तर अमीन आणि खतिजा यांनीही अशाच प्रकारच्या पोस्ट शेअर केल्या आहेत. मुलगा अमीनने लिहिले आहे की, “आमच्या गोपनीयतेचा प्रत्येकाने आदर करण्याची विनंती आम्ही करतो. हे समजून घेतल्याबद्दल धन्यवाद”. त्याचबरोबर खतिजाने लिहिले आहे की, “या प्रकरणाकडे काटेकोरपणे व गोपनीयतेने पाहिले गेले तर मी त्याचे कौतुक करेन. आपल्या विचारांबद्दल सर्वांचे आभार”.
आणखी वाचा – “यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्र सोडवा”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला “हा ‘विनोद’…”
दरम्यान, ए. आर. रहमान व सायरा बानो यांनी याआधी एका निवेदनाद्वारे विभक्त होण्याची घोषणा केली होती. दोघेही बराच वेळ या गोष्टीचा विचार करत होते. घाईघाईत कोणताही निर्णय झालेला नाही. सायरा यांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितलं की, त्या आता हे नातं वाचवू शकत नाहीत आणि त्यामुळे अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.