स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘वैजू नंबर वन’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सोनाली पाटील. अनेक मराठी व हिंदी मालिकांत काम करत तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘बिग बॉस’ मराठी या शोमुळे तिला अधिक लोकप्रियता मिळाली. ती सोशल मीडियावरदेखील चांगलीच सक्रिय असते. अशातच तिने शेअर केलेल्या एका पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओबरोबरच कॅप्शनमध्ये तिने एक खास पोस्ट लिहिली आहे. ज्यामुळे तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Bigg Boss Fame Actress Sonali Patil Shared Video On Instagram)
अभिनेत्रीने कोल्हापुरात तृतीयपंथीयांना भेटल्यानंतरचा तिचा अनुभव चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. हा खास व्हिडीओ शेअर करत तिने असं म्हटलं आहे की, “श्रीकृष्णा तू अद्भुत कलाकृतींचा जनक आहेस हे मला व जगातील बुद्धिमान सजीवांना माहित आहे. तू एक ना अनेक अद्भुत कलाकृती निर्माण केल्या आहेस. त्यामधे स्त्री, पुरुष व त्याव्यतिरिक्त तिसरी व्यक्तीही आहे, ती म्हणजे तृतीयपंथी. ही व्यक्ती ही तूच तयार केली आहेस. पहिल्यापासूनच मला या व्यक्तींबद्दल आकर्षण आणि त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचं कुतूहल होतं.”
आणखी वाचा – प्राजक्ता माळीचा ड्रायव्हर तिच्यावर नेमका का वैतागलाय? पोस्ट शेअर करत केला खुलासा, म्हणाली…
यापुढे ती असं म्हणते की, “श्रीकृष्णा, तुझी कलाकृती इतकी सुंदर व अद्भुत आहे की जेव्हा जेव्हा या व्यक्ती माझ्यासमोर येतात, तेव्हा तेव्हा मी त्यांच्याकडे बघतच राहते. आपल्या भाषेमध्ये त्यांना तृतीयपंथी किंवा थर्ड जेंडर म्हणतात. त्यांच्यापासून मी कधीच पळाले नाही, घाबरले नाही. कदाचित म्हणूनच त्यांना पाहिल्यावर आणि त्यांनी मला पाहिल्यावर आम्ही एकमेकांशी बोललो आणि माझ्या व्लॉगमध्ये कॅप्चरही केलं. ते आपला स्वीकार करतात ना मग चला तर आपण पण त्यांचे होऊ” असं ती या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
याबरोबरच सोनाली तिच्या व्हिडीओमध्ये त्यांना पाहून असं म्हणते की, “एखाद्या मुलीलाही लाजवेल अशा त्या सजतात. मी एक कलाकार असूनदेखील मला जे जमत नाही ते तुम्ही करता आणि ही देवाची देणगी आहे.” यावर व्हिडीओमधील तृतीयपंथीदेखील “हा जगदंबेचा व देवाचा आशीर्वाद आहे.” असं म्हणतात.
दरम्यान सोनालीने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली तिच्या अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तिच्या या तृतीयपंथीयांबरोबर केलेल्या व्हिडीओचे तसेच या व्हिडीओखाली लिहलेल्या कॅप्शनमुळे नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे. नेटकऱ्यांनी सोनालीच्या या व्हिडीओखाली “तु खूप छान आहेस, तु खूप भाग्यवान आहेस, कॅप्शन खूप छान लिहिलं आहेस” अशा अनेक कमेंट्स करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.