‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सीझनमधील एक लोकप्रिय स्पर्धक म्हणजे रुचिरा जाधव. शांत स्वभाव आणि दमदार खेळीच्या जोरावर रुचिराने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. रुचिरा जाधव सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर हटके स्टाईलमधील फोटो व व्हिडीओ शेअर करत नेमहीच चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच तिने शेअर केलेली एक पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
आज शिवजयंतीनिमित्त रुचिराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टखाली लिहिलेल्या कॅप्शनमुळे तिने सर्वांचे लक्ष वधून घेतले आहे. शिवजयंतीनिमित्त खास पोस्ट शेअर करत रुचिराने असं म्हटलं आहे की, “शिवजयंतीच्या निमित्ताने एक आठवण शेअर कराविशी वाटते. ‘बिग बॉस’च्या घरात असताना दर आठवड्याला एंटरटेन्मेंटच्या दिवशी कोणी ना कोणी पाहुणे येत असत. असंच एका दिवशी एक प्रतिष्ठित व्यक्ती आली होती, जी स्वतः कलाकार होती तसेच राजकारणाशी सुद्धा संबंधित होती. कार्यक्रम झाल्यावर त्यांना आदराने निरोप देताना आमच्यापैकी एकाने कोणीतरी “ए चला, त्यांना मुजरा करूया” असं म्हटलं. मग काय, सगळ्यांनी वाकून मुजरा केला. मी मात्र तशीच उभी होते.”
यापुढे तिने असं म्हटलं की, “मला विचारलं, तू का मुजरा केला नाहीस? यावर मी म्हटलं, “मुजरा फक्त महाराजांनाचं.” तत्व म्हणजे तत्व. दिखावा मला कधी जमला नाही आणि जमणार ही नाही आणि कोणासमोर झुकायचं, कोणासमोर झुकायचं नाही हेच जर कळलं नाही, तर आपण महाराजांकडून काय शिकलो?” तसेच या पोस्टसह तिने सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छादेखील दिल्या आहेत.
दरम्यान, रुचिराची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून अनेकांनी रुचिराच्या त्या कृतीचे कौतुक केले आहे. अनेकांनी रुचिराच्या या पोस्टखाली जय शिवराय, शिवजयंतीच्या शुभेच्छा, खूप छान” अशा अनेक कमेंट्सद्वारे तिला प्रतिसाद दिला आहे.