bigg boss marathi 5 fame dhananjay powar : आषाढी वारीनिमित्त राज्यभरात चैतन्याचे वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच कानाकोपऱ्यातील वारकऱ्यांनी पंढरपूरची वाट धरली आहे. वारीच्या निमित्ताने असंख्य संतांच्या पालख्या या पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहेत. असंख्य वारकरी ऊन-वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता विठुरायाच्या चरणी लिन होण्यासाठी निघाले आहेत. याची देही याची डोळा त्यांना पांडुरंगाची आस लागून राहिली आहे. हो या वारीत अनेक कलाकार मंडळी, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरही सहभाग घेताना दिसले. यंदाच्या वारीत कोल्हापूरचा रांगडा गडी, ‘बिग बॉस मराठी’ फेम धनंजय पोवार म्हणजेच डीपीदेखील सहभागी झाला होता. अगदी मनोभावे तो या वारी सोहळ्यात रमलेला दिसला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने याची झलक दाखविली.
मात्र यंदाच्या वारीत डीपीने सहभाग घेताच त्याला मटणावरून ट्रोल केलं गेलं. डीपी आणि मटण प्रेम हे साऱ्यांनाच माहित आहे. वारीत सहभाग घेतल्यानंतर डीपीला नेटकऱ्यांनी इथंही मटण खाऊ नको म्हणत सल्ला दिला आहे. अर्थात, डीपीनेही या नेटकऱ्यांना त्यांच्याच भाषेत प्रतिउत्तर दिलं आहे. सोशल मीडियावर थेट पोस्ट शेअर करत धनंजयने नेटकऱ्यांना प्रतिउत्तर दिलं आहे. भक्ती ही खाण्या-पिण्यावरुन नाही तर ती किती मनापासून, मनोभावे केली जात आहे हे आधी पाहावं असं म्हणत नेटकऱ्यांना टोकलं आहे.
आणखी वाचा – सासरी रमली हिना खान, सासरच्या मंडळींकडून सेवा करुन घेताना दिसली अन्…; कुटुंबियांच्या साधेपणाने वेधलं लक्ष

डीपीने पोस्ट शेअर करत म्हटलं, “काही लोक वारी करताना किंवा देवाची भक्ती करताना इतरांच्या खाण्या-पिण्यावरुन किंवा व्यवसायावरुन जज करतात. पण देव असं कधीच करत नाही. मटण खाणं ही माझी वैयक्तिक आवड आहे. पण माझं मन मात्र विठोबाच्या चरणी आहे. वारी शरीराने केली जाते, पण खरी वारी मनातली असते. देव कर्म बघत नाही, भाव बघतो”. यापुढे तो असं म्हणतो, “विठोबा त्याच भक्तासाठी मटण तोडायला आला होता. देवाने भक्ताचा व्यवसाय बघितला नाही, त्याची निष्ठा बघितली. मग तुम्ही कोण माझी भक्ती नाकारणारे? मी देवावर प्रेम करतो आणि हे प्रेम खाण्या-पिण्याच्या गोष्टींनी कमी होत नाही. देवाचं नाव घेणं कोणाच्याही मालकीचं नाही, कारण देव कोणाचाही द्वेष करत नाही. मग तुम्ही का करताय? मी मटण खातो, हो. पण रोज विठोबाचं नावही घेतो”.
शेवटी डीपी असं म्हणाला आहे, “देव माझं हृदय बघतो, थाळीत काय आहे ते नाही. म्हणूनच मीही वारी करतो आणि अभिमानाने करतो! तू भक्त आहेस आणि भक्ती तुझ्या मनातून येते हे कोणालाही सिद्ध करण्याची गरज नाही. पण तरी कुणी कमी लेखत असेल, तर हे उत्तर देणं, सत्यासाठी उभं राहणं आहे. देव तिथेच आहे, जिथे खरं मन आहे. बाकी सर्व लोकांचं बोलणं वारीनंतर वाऱ्यासारखं उडून जातं”.





