‘बिग बॉस १७’ मधील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री अंकिता लोखंडे व पती विकी जैन. हे दोघे घरात गेल्यापासून कायमच चर्चेत आहे. कधी त्यांच्या भांडणामुळे, तर कधी त्यांच्यातील प्रेमामुळे ही जोडी कायमच चर्चेत राहिली आहे. नुकतंच ही अभिनेत्री तिच्या प्रेग्नन्सीच्या चर्चेमुळेही चांगलीच चर्चेत आली होती. त्यात गेल्या आठवड्यात या शो मध्ये दोघांच्या आईंनी सहभाग घेतला होता. तेव्हा विकीच्या आईने अंकिताला तिच्या वागण्यावरून समज दिली होती. अशातच आता अंकिता व विकी यांच्याबद्दलची आणखी एक माहीती समोर आली आहे. (Ankita Lokhande And Vikcy Jain Fight)
नुकत्याच पार पडलेल्या एका भागात विकी जैन हा समर्थ जुरेलबरोबर अभिषेक कुमारबद्दल बोलत असतो. त्यानंतर समर्थ विकीबरोबर झालेल्या चर्चेचा अभिषेककडे खुलासा करतो. हे ऐकल्यानंतर अभिषेक जेव्हा विकीसमोर जातो, तेव्हा तिघांमध्ये मोठा गैरसमज निर्माण होतो. याबद्दल अंकिता विकीला समजावत असं म्हणते की, “जर एखाद्याला तुझ्याशी बोलायचं नसेल, तर तू त्यांच्याशी बोलू नकोस. मी इथे तुझ्याबरोबर आहे. ज्या लोकांना तुझ्याबरोबर बसायचं आहे, ते तुझ्याबरोबरच बसतील. त्यांना खेळाविषयी काहीच माहीत नाही. पण अशा गोष्टी घडत असतात. जेव्हा तू समर्थबरोबर बोलत होतास, तेव्हा मी तुला इशारा दिला होता. तो तुझ्या पाठीत खंजीर खुपसणार, हे मी तुला आधीच सांगितलं होतं आणि अखेर तसंच झालं. समर्थ तुझ्याबरोबर ज्या पद्धतीने बोलतो, ते मला आवडत नाही. तू त्यांच्या ओव्हर स्ट्रॅटेजीमध्ये फसला आहेस.”
यापुढे ती विकीला असं म्हणते की, “ज्या लोकांनी तुझा अनादर केला, ते माझ्या घरी येणार नाहीत. हा एक खेळ आहे हे मला मान्य आहे. पण त्या लोकांना तू घरी आणलंस तर मी घर सोडून निघून जाईन. दरम्यान, गेल्या वीकेण्ड का वार’मध्ये सलमानने विकी व मुनव्वरच्या खेळाबाबत खुलासा केला होता. याबद्दल अंकिता विकीला असं म्हणते की “तू व मुनव्वर एका खेळात सहभागी होतात. पण तू तुझं डोकं चालवून म्हणालास की तू एकटाच खेळतोय. मात्र मुनव्वरने असं दाखवलं नाही. मुनव्वर सोडून घरातील इतर सदस्यांबरोबर माझं नातं चांगलं आहे. या शोमधून बाहेर पडल्यानंतरही मी त्यांच्या संपर्कात राहीन. त्याची खेळण्याची स्वत:ची एक वेगळी पद्धत आहे. तो खेळण्याच्या बाबतीत खूपच हुशार आहे. तुझी खेळी आता सर्वांना समजली आहे. त्यामुळे तुझ्यावर आता कोणाचा विश्वास राहिला नाही” अशा शब्दांत अंकिता विकीला समजावते.
दरम्यान अंकिता-विकी यांच्यात आता पुन्हा काही वाद निर्माण होणार का? त्यांच्यात पुन्हा दुरावा येणार का? सोशल मीडियावर अश्या अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर अंकिताच्या बोलण्याने विकीच्या खेळण्यावर काही परिणाम होणार का? हे पाहण्यासाठी चाहतेदेखील उत्सुक आहेत हे नक्की.