दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या पहिल्या भागाला भरगोस यश मिळालं. त्यानंतर सगळ्यांना या चित्रपटाच्या दुसऱ्या भागची आतुरता लागून होती. तर आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा झाली आहे. नुकताच ‘धर्मवीर २’ चित्रपटाचा मुहुर्त सोहळा पार पडला. ठाण्यातील आनंदाश्रमात हा मुहुर्त सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आनंद दिघे यांच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता प्रसाद ओकही उपस्थित होता. यादरम्यान प्रसादने ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या एका मुलाखतीत या भूमिकेसाठी त्याने बरंच वजन कमी केलं असल्याचा खुलासा केला. (prasad oak lost weight for movie)
‘धर्मवीर’ चित्रपटाच्या पहिल्या भागावेळीही त्याने आपलं वजन बरंच वाढवलं अन् कमीही केलं होतं. आताही चित्रपटाच्या पुढच्या भागासाठी त्याला स्वतःचं वय कमी करावं लागलं आहे. याबाबत प्रसादने खुलासा करताना सांगितलं, “मी या भूमिकेसाठी अगोदरच ६ ते ७ किलो वजन कमी केलं आहे. अजून १ ते २ किलो वजन कमी करायचं आहे. कारण दिघे साहेबांच्या अंगगाठीला वेष धारण केल्यानंतर ते शोभणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी वजन कमी करणं तेव्हाही आणि आताही गरजेचं होतं”.
“त्याचबरोबर मी दुसरा एक प्रोजेक्टसाठी वजन वाढवलं होतं. जो पुढे झालाच नाही. पण त्यानंतर ‘धर्मवीर २’चं चित्रपटाच्या चित्रीकरणाबाबत ठरलं. त्यामुळे गेल्या सव्वा महिन्यात जवळ जवळ सव्वा ६ किलो वजन मी कमी केलं”, असा खुसाला त्याने केला.
या मुहुर्त कार्यक्रमाचं आयोजन निर्माते सचिन जोशी व मंगेश देसाई यांच्यामार्फत करण्यात आलं होतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा मुहुर्त सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. दरम्यान या कार्यक्रमाला अभिनेता प्रसाद ओकसह स्नेहल तरडे, महेश लिमये, मंगेश कुलकर्णी यांच्यासह चित्रपटातील इतर कलाकार मंडळींनीही हजेरी लावली होती.