सोशल मीडियावर कित्येक ट्रेंडिंग रिल्स, व्हिडीओ आपण पाहतो. रिल्सच्या माध्यमातून तर प्रेक्षकांचं अधिकाधिक मनोरंजन होतं. कलाकार मंडळी तर कामामधून वेळ काढत रिल व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे शेअर करताना दिसतात. चित्रीकरणामधूनही मिळालेल्या ब्रेकमधील कलाकार रिल व्हिडीओ शूट करतात. रिलद्वारे चाहत्यांचं मनोरंजन करणं हा आता नवा ट्रेंड सुरु झाला आहे. यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीमधील सगळ्यांचं लाडकं जोडपं अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकरही काही मागे नाहीत. दोघांच्या व्हिडीओंनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
ऐश्वर्या व अविनाश सध्या दोन विविध मराठी मालिकांमध्ये उत्तम काम करत आहेत. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेमध्ये ऐश्वर्या साकारत असलेलं पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. तर ’३६ गुणी जोडी’ मालिकेत अविनाश करत असलेलं काम उल्लेखनीय आहे. पण कामामधून वेळ काढत हे दोघंही विविध व्हिडीओ तयार करतात. तसेच छोट्या व्हिडीओमधून चाहत्यांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतात.
ऐश्वर्या व अविनाश यांचे डान्स व्हिडीओ तर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. असाच अविनाश यांचा एक व्हिडीओ मध्यंतरी चर्चेचा विषय ठरला होता. ते गणपतीनिमित्त त्यांच्या कोकणातील गावी गेले होते. त्यादरम्यान त्यांनी एक व्हिडीओ शूट केला. या व्हिडीओमध्ये अविनाश ‘पप्पांनी गणपती आणला’ गाण्यावर डान्स करताना दिसले. मात्र या व्हिडीओवरुन त्यांना बरंच ट्रोल करण्यात आलं. मीम्स शेअर करणाऱ्या एका पेजनेही त्यांचा हा व्हिडीओ शेअर केला. मात्र यावर ऐश्वर्या यांनी संताप व्यक्त केला आहे.

‘पप्पांनी गणपती आणला’ गाण्यावर डान्स करतानाचा अविनाश यांचा व्हिडीओ मीम्स शेअर करणाऱ्या पेजवर पाहिल्यानंतर ऐश्वर्या यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली. त्या पेजचा स्क्रिनशॉट इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे ऐश्वर्या यांनी शेअर केला. त्या म्हणाल्या, “काय लायकी आपली?”. ऐश्वर्या यांनी संताप व्यक्त केल्यानंतर त्या मीम पेजने अविनाश यांचा व्हिडीओ डिलिट केला. पण पती ट्रोल होत आहेत हे पाहून ऐश्वर्या यांनी उचलेलं पाऊल खरंच कौतुकास्पद आहे.